मुंबई, दि. ३०: दौंड (जि. पुणे) आष्टी (जि. बीड), माळशिरस (जि. सोलापूर) विधानसभा मतदार संघातील जलसंपदा विभागाकडील विविध जलसिंचनाच्या कामाचा आढावा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला.
मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीस आमदार राहुल कुल, आमदार सुरेश धस, माजी आमदार राम सातपुते, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हणमंत गुणाले, मुख्य अभियंता धुमाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, तर गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मंत्री विखे-पाटील म्हणाले, दौंड तालुक्यात खानोटा येथे बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे सर्वेक्षण काम सुरू करावे. या बंधाऱ्याच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या मान्यता गतीने घेण्यात याव्यात आणि एक महिन्यात याचा सविस्तर अहवालात तयार करावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी दिल्या. यावेळी त्यांनी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेज बंधाऱ्यात रूपांतर करण्याबाबतचाही आढावा घेतला. जनाई शिरसाई योजनेतील जी कामे करायचे आहेत त्या कामांची निविदा काढण्याची कार्यवाही करावी. यासाठी आवश्यक प्रस्ताव दाखल करून मान्यता घ्यावी. दौंड मतदार संघातील जलसिंचनाची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
माळशिरस तालुक्यातील नीरा उजवा कालव्यावरील माचणूर विभागातील गावांना बारमाही पाणी देण्याबाबत कार्यवाही करावी,अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत दिल्या.
आष्टी तालुक्यातील जलसिंचनाच्या कामांचा आढावा घेताना मंत्री विखे-पाटील म्हणाले, ज्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत ती कालमर्यादेत पूर्ण करावीत. प्रकल्पाची सर्वेक्षण अंदाजपत्रके तातडीने सादर करावीत अशा सूचना त्यांनी दिल्या.
०००
एकनाथ पोवार/विसंअ