Pune | Sun, 15 February 2026

Ad

जलसंपदा मंत्र्यांची मैदानात फटकेबाजी; बुद्धिबळातही आजमावले कौशल्य

Sunil Goyal | 7 views
जलसंपदा मंत्र्यांची मैदानात फटकेबाजी; बुद्धिबळातही आजमावले कौशल्य

​शिर्डी, दि.७ :- प्रशासकीय कामाच्या व्यापातून वेळ काढत अधिकाऱ्यांनी मैदानात गाजवलेले कसब व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुद्द मंत्र्यांनीच हातात घेतलेली बॅट… अशा अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात शासनाच्या जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना लोणी बुद्रुक येथे शानदार सुरुवात झाली. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) गिरीश महाजन व जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळात सहभाग नोंदवत खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला.

​प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध क्रीडांगणांवर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये पुरुष व महिलांसाठी क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ व जलतरण यांसारख्या विविध खेळांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेचा शुभारंभ केल्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी केवळ औपचारिक हजेरी न लावता क्रिकेटच्या खेळपट्टीवर बॅटिंगचे कौशल्य आजमावले. तसेच बुद्धिबळाच्या पटावरही काही वेळ चाल खेळत बौद्धिक कौशल्याची चुणूक दाखवली.

​यावेळी मंत्री श्री. महाजन आणि मंत्री डॉ. विखे पाटील यांनी कबड्डीपटू व इतर स्पर्धकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. “खेळांमुळे सांघिक भावना वाढीस लागते. निरोगी आयुष्यासाठी खेळाची नितांत गरज आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला चालना मिळून प्रशासनात शिस्त व आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन मिळेल,” असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

​याप्रसंगी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव (लाभक्षेत्र विकास) संजय बेलसरे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध जिल्ह्यांतून आलेले खेळाडू व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp