Pune | Sat, 11 October 2025

Ad

कामगार विभागाची सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम व कार्यक्षम करा – मंत्री ॲड. आकाश फुंडकर

Sunil Goyal | 6 views
कामगार विभागाची सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम व कार्यक्षम करा – मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई, दि. ३० : राज्यातील कामगार विभागांतर्गत सर्व सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम आणि कार्यक्षम होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कामगार विभागाने तत्काळ राबवाव्यात, असे निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले.

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळांचा सविस्तर आढावा कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला. या बैठकीस कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस, अवर सचिव दिलीप वनिरे तसेच कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राज्यातील एकूण १६ सुरक्षा रक्षक मंडळांचा सर्वसाधारण आढावा घेण्यात आला. यावेळी प्रत्येक मंडळासमोरील अडचणी, त्यांच्या कार्यातील अडथळे तसेच त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मंत्री ॲड. फुंडकर यांनी या मंडळांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी, विविध आस्थापना आणि जिल्ह्यांतील आरोग्य विभाग तसेच रुग्णालयांमध्ये सुरक्षा रक्षकांची आवश्यकता तपासून त्यानुसार तात्काळ लेखी मागणी घेण्यात यावी, असे निर्देश मंत्री ॲड. फुंडकर यांनी विभागांना दिले.

जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांच्या अध्यक्षांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवून मंडळाचे सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले. या मोहिमेसाठी विभागीय कामगार अतिरिक्त/उप आयुक्तांनी आवश्यक सहकार्य करावे, असेही मंत्री ॲड.फुंडकर यांच्याकडून निर्देशित करण्यात आले.

०००

संजय ओरके/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp