Pune | Tue, 17 March 2026

Ad

खारघर येथे श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

Sunil Goyal | 5 views
खारघर येथे श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

नवी मुंबई, दि. २८ : मानवतेसाठी सर्वोच्च बलिदान देणारे शिख पंथाचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त खारघर येथे भव्य जनकल्याण चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कोश यांच्या सौजन्याने आयोजित या उपक्रमास देशभरातून आलेल्या भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

समागमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या आरोग्याची सर्वंकष काळजी घेत विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत बहुआयामी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरात फिजिओथेरपी सेवा कक्ष, दंतरोग तज्ज्ञ कक्ष, अस्थिरोग तज्ज्ञ कक्ष, कान-नाक-घसा तज्ज्ञ कक्ष, हृदयरोग तज्ज्ञ कक्ष, मेडिसिन विभाग, तसेच ईसीजी व रक्तदाब तपासणी कक्ष यांचा समावेश होता.

विशेष म्हणजे कॅन्सर स्क्रीनिंग चाचण्या आणि मोफत केमोथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक बांधिलकी जपत अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. गरजू रुग्णांसाठी मोफत औषध वाटपाचीही सोय करण्यात आली होती.

या शिबिरात एमजीएम मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे डीन डॉ. जी. एस. नरशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रदीप सावर्डेकर, डॉ. नव्या बाबू, डॉ. आदित्य ढाकणे, डॉ. मोहिनी धर्मा आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा दिली. तसेच नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका तसेच आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.

भाविकांनी मोठ्या संख्येने विविध तपासण्या करून घेत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतले. आरोग्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे समागमाला सामाजिक उत्तरदायित्वाची भक्कम जोड मिळाली. मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या महान बलिदानाच्या स्मरणार्थ आयोजित या आरोग्य शिबिराने “सेवा हीच खरी श्रद्धांजली” हा संदेश अधोरेखित करत समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण केला.

00000

 

शैलजा पाटील/संध्या गरवारे/कोकण भवन पथक

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp