Pune | Sun, 15 February 2026

Ad

कोकण खोरे विकास महामंडळा अंतर्गत मान्यता झालेल्या सिंचन प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

Sunil Goyal | 1 views
कोकण खोरे विकास महामंडळा अंतर्गत मान्यता झालेल्या सिंचन प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा  – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

ठाणे,दि.15(जिमाका) :-  कोकण खोरे विकास महामंडळांतर्गत मान्यता झालेल्या सिंचन प्रकल्पांची कामे गतीने  व विहीत कालावधी पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश जलसंपदा ( विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच दिले.

ठाणे येथील कोकण खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात मंत्री श्री.महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दि.११ फेब्रुवारी रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत कोकण पाटबंधारे महामंडळाच्या विविध कामांना मान्यता देण्यात आली.

या बैठकीस  जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कोकण खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले,विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के,  यासह विविध क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. तसेच वित्त विभाग व नियोजन विभागाचे अधिकारी दुरदुष्यप्रणाली द्वारे सहभागी झाले होते.

याप्रसंगी विविध सिंचन प्रकल्पातील कामांचा मंत्री श्री. महाजन यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या कामांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होत होणार असल्याने ही कामे गतीने व निर्धारित वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. तसेच आर्थिक वर्षात प्राप्त झालेला निधी १०० टक्के खर्च होईल यासाठी देखील सर्व अधिकारी व यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे निर्देश यावेळी मंत्री महाजन यांनी दिलेत.

यावेळी कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत देहरजी प्रकल्प, काळू प्रकल्प, बाळगंगा, हरिहरेश्वर प्रकल्प, पोशीर प्रकल्प, शेलार प्रकल्प आदींचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा व महत्वकांक्षी ठरणाऱ्या योजनांचा कामांना गती देण्याचे देखील निर्देश यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. तसेच प्रशासकीय मान्यता झालेल्या प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

000000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp