नवी दिल्ली, दि. ३० : डन ऍन्ड ब्रॅडस्ट्रीट या संस्थेच्या वतीने दिला जाणारा पॉवर ट्रान्समिशन (स्टेट पीएसयू) पुरस्कार यंदा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला (महापारेषण) मिळाला. केंद्रीय वित्त विभागाचे सहसचिव नवीन अग्रवाल यांच्या हस्ते महापारेषणचे मुख्य अभियंता किशोर गरूड व जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पारितोषिकाबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
नवी दिल्लीतील हॉटेल ताज मानसिंगमध्ये १७ व्या पीएसयू आणि शासन परिषदेत हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय ग्रामीण विकास विभागाचे सहसचिव कुणाल सत्यार्थी उपस्थित होते.
महापारेषण ही देशातील सर्वात मोठी पारेषण कंपनी आहे. अति उच्चदाब वाहिन्यांचे जाळे सर्वदूर आहे. महाराष्ट्र राज्याची ३० हजार मेगावॉटपेक्षा अधिक विजेची मागणी महापारेषणने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून महापारेषणने वीजक्षेत्रात नवा उच्चांक गाठला आहे. विशेषतः दुर्गम, डोंगराळ भागात ड्रोनच्या सहाय्याने कामे केली जात आहेत. तसेच हाय परफॉर्मेस कंडक्टर बसविण्यात आले आहेत. ग्रिड स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी धुळे व लोणीकंद (पुणे) येथे स्टॅटकॉम प्रकल्प प्रस्तावित आहेत. टी.बी.सी.बी.च्या माध्यमातून प्रकल्पांकरिता खुला सहभाग महापारेषणने ठेवला आहे.
तंत्रज्ञानामुळे महापारेषणची प्रगती : डॉ. संजीव कुमार
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महापारेषणमध्ये विविध प्रकल्प व संचलन चांगल्या पध्दतीने व वेगाने होत आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यकुशलता वाढली आहे. भविष्यातही, अधिकारी व कर्मचारी नावीन्यपूर्ण काम करून महापारेषणचे नाव नक्कीच उंचावतील, असे महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
०००
संध्या गरवारे/विसंअ