मुंबई, दि. ३०: राज्यभरात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकरी बांधवाना मदत व्हावी, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी एक कोटीचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द केला.
राज्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीत मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. याकरिता राज्यभरातील अनेक संस्थांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. राज्यावर आलेल्या या संकटाला आर्थिक मदतीचा हातभार लावणं आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. मंत्री पंकजा मुंडे व मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एक कोटींचा धनादेश सुपूर्द केला.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ