Pune | Fri, 10 October 2025

Ad

महाराष्ट्राच्या खेळाडूंना वैद्यकीय विमा कवच देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Sunil Goyal | 13 views
महाराष्ट्राच्या खेळाडूंना वैद्यकीय विमा कवच देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील क्रीडापटूंना वैद्यकीय विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात क्रीडा विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, क्रीडा आयुक्त शितल तेली-उगले, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्यप्रणालीद्वारे), क्रीडा विभागाचे पुणे विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, जय कवळी, अदिल सुमारिवाला यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध विभागांच्या ताब्यात असलेली खेळांची मैदाने क्रीडा विभागाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव तयार करून तो मंत्रिमंडळासमोर मांडावा. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी प्रावीण्य प्राप्त खेळाडू व क्रीडा संघटनांचा समावेश करण्यासाठी शासन निर्णयात सुधारणा कराव्यात. तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि राज्यातील मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी शासनाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात प्रतिभासंपन्न खेळाडू घडविण्यासाठी तसेच खेळाडूंची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी सुधारण्यासाठी क्रीडा क्षेत्राला पायाभूत सुविधा, अत्याधुनिक साहित्यांसह मार्गदर्शकांसाठी आवश्यक असणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. राज्यात क्रीडा सुविधा निर्मितीसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात मिशन लक्षवेध’ योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp