Pune | Sun, 15 February 2026

Ad

महाराष्ट्राने एक निर्भीड, कार्यक्षम आणि प्रशासनावर सखोल पकड असलेला कणखर नेता गमावला – राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर

Sunil Goyal | 10 views
महाराष्ट्राने एक निर्भीड, कार्यक्षम आणि प्रशासनावर सखोल पकड असलेला कणखर नेता गमावला – राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. २९ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या अचानक झालेल्या दुःखद निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक निर्भीड, कार्यक्षम आणि प्रशासनावर सखोल पकड असलेला कणखर नेता गमावला आहे, अशी भावना ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केली.

अजितदादा पवार यांनी सार्वजनिक जीवनात नेहमीच स्पष्ट भूमिका घेतल्या. अर्थ खात्याच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही दिशादर्शक ठरतात. प्रशासनातील बारकावे, आकडेवारीवरची त्यांची पकड आणि निर्णयक्षम नेतृत्व यामुळे ते एक वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. राजकीय मतभेद असूनही विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच व्यापक दृष्टिकोन ठेवला, असे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

राजकारणाच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक नातेसंबंध जपणारा, सहकाऱ्यांशी संवाद साधणारा आणि कामात प्रामाणिकपणा जपणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख होती. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या कठीण प्रसंगी पवार कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना करत महाराष्ट्राच्यावतीने  अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असल्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp