
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानाच्या माध्यमातून महिलांना निरोगी, सशक्त आणि आत्मनिर्भर करण्याचा निर्धार केला आहे. या अभियानाविषयी ही माहिती….
महिलांना त्यांच्या घराजवळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे तसेच त्यांना अधिक निरोगी, सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे या उद्देशाने देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान राबविण्यात येत आहे.
महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी इंदौर, मध्य प्रदेश येथे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झाला असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरात सर्वत्र करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील शुभारंभ सोहळा 17 सप्टेंबर 2025 रोजी राज्यभर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मान्यवर या सोहळ्यास बीड येथून ऑनलाईनही सहभागी झाले आहेत.
अभियानाची उद्दिष्ट्ये
या अभियानाचा मुख्य उद्देश देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये महिला आणि मुलांसाठी तपासणी व विशेषज्ञ आरोग्य शिबिरांचे आयोजन आयुष्यमान आरोग्य मंदिरांमध्ये दररोज तपासणी आणि जनजागृती शिबिरांचे आयोजन ग्रामीण रुग्णालये/उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे विशेषज्ञाव्दारे तपासणी शिबिरांचे आयोजन खासगी महात्मा फुले जनआरोग्य योजना संलग्नीत रुग्णालये व क्लिनिक येथे देखील विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
या शिबिरांमध्ये विविध आरोग्य सेवा पुरवल्या जातील, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
महिलांची आरोग्य तपासणी:-
उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदानासाठी तपासणी करणे. तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठीची तपासणी करणे. जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग तपासणी किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया (रक्तक्षय) तपासणी आणि समुपदेशन. आदिवासी भागातील महिलांसाठी सिकल सेल तपासणी कार्ड वाटप आणि आदिवासी भागात सिकल सेल आजाराबाबत समुपदेशन.
माता आणि बाल आरोग्य सेवा
गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी, तपासणी व समुपदेशन, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन, बालकांचे आवश्यकतेनुसार लसीकरण.
आयुष सेवा
या अंतर्गत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिध्द व नॅचरोपॅथी इ. पर्यायी उपचार पध्दतींची सेवा गरजू रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
जनजागृती आणि वर्तणूक बदल संवाद
किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्रे महिला बचत गट आणि पंचायत प्रतिनिधींच्या माध्यमातून खाद्यतेल आणि साखरेचा वापर कमी करण्यावर समुपदेशन. पोषण विषयी समुपदेशन व निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन
रक्तदान शिबीरे
१ ऑक्टोबर हा राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिन असून त्याअनुषंगाने राष्ट्रीय महास्वेच्छा रक्तदान या अभियानात राबविण्यात येईल. इंडियन रेड क्रॉस सोसायटी, अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद इ. संस्थांच्या साहायाने १ लाख युनिट रक्त गोळा करण्याचे ध्येय असून, रक्तदात्यांची नोंदणी करण्याचेही प्रस्तावित आहे. My Gov पोर्टलद्वारे रक्तदान प्रतिज्ञा उपलब्ध करुन देण्यात येईल.
नोंदणी आणि कार्ड वाटप
आयुष्यमान भारत डिजीटल मिशन कार्ड, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणी व आयुष्यमान वय वंदना कार्ड वाटप सर्व गरजू व पात्र लाभार्थ्यांना करण्यात येईल.
क्षयरोग निर्मुलनासाठी निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी
क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषक आहार उपलब्ध करुन देण्यासाठी आणि क्षयरोगाविरुध्द जन आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी दानशुर व्यक्ती, संस्था आणि संघटनांना निक्षय मित्र बनवून सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. याकरिता माय भारत स्वयंसेवक अथवा इतर स्वयंसेवकाच्या मदतीने निक्षय मित्रांची नोंदणी वाढवण्यात येईल, जेणेकरुन क्षयरोग मुक्त भारताचे ध्येय साध्य करणे शक्य होईल. तपासणी शिबीरामध्ये (स्क्रिनिंग कॅम्प) आवश्यक असणाऱ्या रुग्णांना विशेषज्ञाकडून तपासणीसाठी संदर्भित केले जाईल व त्यांच्या आवश्यक त्या रक्त, लघवीच्या तपासण्या, सोनोग्राफी, क्षकिरण तपासणी व शस्त्रक्रिया मोफत व नियोजन करुन करण्यात येत आहेत.
७५ उपक्रमांचे आयोजन
महाराष्ट्र राज्यात १७ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ उपक्रमः राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये खालील उपक्रमांचा समावेश राहील. प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये आरोग्य शिबिरे, असंसर्गजन्य रोग तपासणी शिबिरे (मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग), मोफत चष्मा वाटपासह नेत्र तपासणी शिबिरे, दंत तपासणी शिबिरे, माता आणि बाल आरोग्य शिबिरे (प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण), महिला आणि बालकांसाठी पोषण जागरूकता सत्रे, ठिकाणी आयुष आणि योग शिबिरे, क्षयरोग जागरूकता आणि तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, अवयवदान प्रतिज्ञा शिबिरे, मोफत औषध वितरण शिबिरे, निदान शिबिरे (पॅथॉलॉजी, एक्स-रे, ईसीजी), कर्करोग जागरूकता आणि तपासणी शिबिरे, मानसिक आरोग्य समुपदेशन शिबिरे, व्यसनमुक्ती जागरूकता सत्रे, किशोरवयीन आरोग्य सत्रे, शालेय आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता आणि स्वच्छता जागरूकता शिबिरे, ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर आरोग्य मेळावे/प्रदर्शने, दुर्गम भागांसाठी टेलिमेडिसिन सल्लामसलत. या उपक्रमांव्दारे आरोग्य सुविधा मिळणार आहेत.
सहभागी संस्था व केंद्रे: राज्यातील १०,७६६ उपकेंद्रे १९३९ प्राथमिक आरोग्य केंद्रे ७९७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे १,०४० शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रे ३७२ ग्रामीण रुग्णालये, १०२ उपजिल्हा रुग्णालये, ८ सामान्य रुग्णालये, २२ स्त्री रुग्णालये, २ संदर्भ सेवा रुग्णालये व १९ जिल्हा रुग्णालये. राज्यातील सर्व आरोग्य केंद्रे, संस्था, वैद्यकीय महाविद्यालये व खासगी महात्मा फुले जन आरोग्य योजना संलग्न रुग्णालये सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांचा अभियानात सक्रिय सहभाग लाभणार आहे. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’या अभियानाच्या माध्यमातून देशातील, राज्यातील स्त्रीशक्तीला आरोग्यदायी आणि अधिक बळकट करण्याचा निर्धार आहे. आपण सर्वांनी या अभियानात सक्रीय सहभागी व्हावे व महिलांनी लाभ घ्यावा अशी अपेक्षा आहे.
०००
- अनिल आलुरकर, उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, अमरावती
