नागपूर, दि. ३० : ज्या भागात पाणंद रस्त्यांना पर्याय म्हणून भक्कम मोठे रस्ते उपलब्ध झाले अशा जुन्या पाणंद रस्त्याच्या बाजुला अनेक वर्षापासून आश्रय घेतलेल्या गोरगरिब कुटुंबांना आपल्या मालकीचा निवारा मिळावा, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. यातूनच आपण पट्टे वाटप मोहिमेला गती दिली. हुडकेश्वर येथील जुन्या पाणंद रस्त्यावरील गत अनेक वर्षापासून आश्रयास असलेल्या 59 नागरिकांसह एकूण 104 नागरिकांना त्यांच्या मालकीची सनद देतांना मनस्वी आनंद व समाधान असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ अंतर्गत हुडकेश्वर येथील इंगोले नगर येथे त्यांच्या हस्ते पट्टे वाटप करण्यात आले. २९ सप्टेंबर रोजी झालेल्या या समारंभास उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक सतीश पवार, तहसीलदार कल्याणकुमार दहाट तसेच अन्य मान्यवर, अधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणंद रस्त्यावरील त्या 59 नागरिकांना आपल्या मालकीची आता सनद अर्थात जागेचा पट्टा मिळाल्याने एक नवी उभारी या कुटुंबांनी घेतली. शासनाच्या या निर्णयाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करुन पट्टे वाटप योजनेची उपयोगीता अधोरखित केली. पाणंद रस्त्यावरील अतिक्रमीत घरांना कायदेशीर करून पट्टे वाटप करण्याचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम असून, हा प्रयोग समाजातील सर्वसामान्यांना न्याय देणारा आणि खऱ्या अर्थाने लोकाभिमुख शासनाचा एक मापदंड म्हणून आता नोंदविला गेला आहे.
सेवा, स्वामित्व आणि सबलीकरणाचा संगम
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (17 सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबर) राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमात हा कार्यक्रम नागरिकांपर्यंत सरकारच्या सेवाभावाची साक्ष देणारा ठरला. नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम देत पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणधारक 59 कुटुंबांना अखेर त्यांच्या घराचा कायदेशीर हक्क प्राप्त झाला,
हुडकेश्वर येथील पाणंद, सर्व्हे नं. 173 व 174 येथे 59 पट्टे, हुडकेश्वर गावठाण शेजारील सर्व्हे नं. 1 येथे 45 पट्टे असे एकूण 104 नागरिकांना त्यांच्या मालकीच्या सनद प्रदान करण्यात आल्या. हातात सनद/पट्टा मिळताच अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.
०००