
मुंबई, दि. १८: मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘इनोव्हेटिव सोल्यूशन फॉर लिव्हेबल अर्बन फ्यूचर’ या विषयावर शहरी विकास, पाणी व्यवस्थापन, हवामान बदल आणि टिकाऊ शहर नियोजन यावर विविध तज्ज्ञांनी नवकल्पनांवर भर दिला.
मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘इनोव्हेटिव सोल्यूशन फॉर लिव्हेबल अर्बन फ्यूचर’ या विषयावर जिओ वर्ल्ड सेंटर, वांद्रे येथे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले.या सत्रात सीताराम शेलार (पाणी हक्क समिती), नताशा जरीन (इकोसत्व), मानसी साहू (स्टुडिओ पॉड), प्रदीप कलबर (आयआयटी मुंबई), राज भगत (डब्ल्यूआर इंडिया), प्रेरणा लांगा (आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट) आदी मान्यवरांनी या आपले सादरीकरण केले.
मूलभूत बाबींवर लक्ष देण्याची गरज
मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद अरिबम शर्मा यांनी नवकल्पनांवर बोलताना मूलभूत बाबींवर लक्ष देण्याचे आवाहन केले. नवीन तंत्रज्ञान, एआय किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म महत्त्वाचे असले तरी त्याआधी लोकसंख्या, पाणी, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन याचे शास्त्रीय नियोजन आवश्यक आहे असे ते म्हणाले.
शर्मा यांनी विकेंद्रीकृत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची गरज अधोरेखित करत पुनर्वापराच्या संकल्पनेला खरी नवकल्पना असल्याचे नमूद केले. तसेच कोणताही प्रकल्प राबवताना राजकीय, आर्थिक, सामाजिक, तांत्रिक, पर्यावरणीय आणि कायदेशीर घटकांचा सखोल विचार करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली.
स्थानिक भूगोल आणि हवामान समजून घेणे महत्त्वाचे
मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करतांना वक्त्यांनी स्थानिक भूगोल आणि पर्जन्यमान लक्षात घेऊनच नियोजन करण्याचा सल्ला दिला.
युरोपमधील मॉडेल जसेच्या तसे भारतात लागू करता येत नाही. प्रत्येक शहराची हवामान व सामाजिक परिस्थिती वेगळी असते, नवकल्पना म्हणजे योग्य नियोजन आणि टिकाऊ विकास नवकल्पना म्हणजे केवळ नवे तंत्रज्ञान नव्हे, तर संसाधनांचा योग्य वापर, दीर्घकालीन टिकाऊपणा आणि लोकसहभाग असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. “वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. स्थानिक वास्तव समजून घेतले, तरच शहरी प्रकल्प यशस्वी होतात, असे विविध वक्त्यांनी यावेळी सांगितले.
०००
राजू धोत्रे/विसंअ
