Pune | Thu, 19 February 2026

Ad

मुंबई क्लायमेट वीकमध्ये अंतराळवीर राकेश शर्मा व शुभांशू शुक्ला यांचा विद्यार्थ्यांना शाश्वत जीवनशैलीचा संदेश

Sunil Goyal | 1 views
मुंबई क्लायमेट वीकमध्ये अंतराळवीर राकेश शर्मा व शुभांशू शुक्ला यांचा विद्यार्थ्यांना शाश्वत जीवनशैलीचा संदेश

मुंबई, दि. १८: अंतराळातून पाहिल्यावर देश, शहर किंवा सीमा यांची ओळख मागे पडते आणि पृथ्वी हीच आपली ओळख वाटते, अशी भावना अंतराळातून पृथ्वीकडे पाहताना निर्माण झाल्याचा अनुभव भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा व नुकतेच अंतराळस्थानकावर जाऊन आलेले अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी सांगितला.

Oplus_131072

भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये अवकाश, पर्यावरण आणि मानवी जबाबदारी यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. देशाचे दोन अवकाशवीर राकेश शर्मा आणि शुभांशू शुक्ला “सारे जहाँ से अच्छा” या विशेष सत्रात प्रथमच एका मंचावर एकत्र आले. क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला. विविध शाळांतील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेत अवकाशवीरांशी थेट संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार गौरव सावंत यांनी केले.

Oplus_131072

अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळातून पृथ्वी पाहताना झालेल्या अनुभूती सांगताना प्रदूषणाचे गंभीर परिणाम अधोरेखित केले. पृथ्वीचा निळसर रंग कमी होत करडेपणा वाढल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. “हे केवळ दृश्य बदल नाही, तर आपल्या पर्यावरणीय स्थितीचे स्पष्ट संकेत आहेत,” असे ते म्हणाले. अंतराळातून पाहिलेल्या जंगलाच्या आगी, धुराचे प्रचंड ढग आणि पसरलेले प्रदूषण यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक कृती जागतिक परिणाम घडवते, हे स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.

Oplus_131072

पृथ्वीचे वातावरण आपल्याला हानिकारक किरणांपासून वाचवते; मात्र मानवी हस्तक्षेपामुळे ही संरक्षक ढाल कमकुवत होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जंगलतोडीमुळे मातीची धूप, समुद्री जीवनावर होणारा परिणाम आणि परिसंस्थेतील असंतुलन यांचा साखळी परिणाम हवामान बदलाला गती देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Oplus_131072

महात्मा गांधींच्या विचारांचा उल्लेख करत शर्मा म्हणाले, “पृथ्वी प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेशी आहे; परंतु प्रत्येकाच्या लोभासाठी नाही.” संसाधनांचा अतिरेक, असमान वितरण आणि विकासाच्या नावाखाली होणारे पर्यावरणीय नुकसान भविष्यातील संघर्षांचे कारण ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. शाश्वत विकास, जागतिक सहकार्य आणि न्याय्य संसाधनवाटप हीच शांततामय भविष्यासाठीची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

अंतराळातील जीवनशैलीचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, तेथे प्रत्येक थेंब पाणी, प्रत्येक श्वासातील हवा पुनर्वापरावर आधारित असते. “अंतराळात जगण्यासाठी शाश्वतता हा पर्याय नसून गरज आहे; पृथ्वीवरही ती शक्य आहे,” असा संदेश त्यांनी दिला.

 

शाश्वततेचे तीन मंत्र

शुभांशू शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना शाश्वत जीवनशैलीचे अन्न वाया जाऊ देऊ नका, कोरडा व ओला कचरा वेगळा करा आणि प्रत्येक छोट्या कृतीवर विश्वास ठेवा हे तीन साधे पण प्रभावी मंत्र दिले. आपण १.४ अब्ज लोक आहोत. प्रत्येकाने छोटा बदल केला, तरी त्याचा एकत्रित परिणाम मोठा असेल, असे त्यांनी सांगितले.

अंतराळ स्थानकावरील जीवनाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, तेथे जवळपास ९८ टक्के पाणी पुनर्वापर केले जाते, हवा पुनर्प्रक्रियेद्वारे वापरली जाते आणि संसाधनांचा काटेकोर वापर केला जातो. शाश्वत जीवनशैली शक्य आहे; फक्त सवयी बदलण्याची तयारी हवी, असे ते म्हणाले. अनुभूतीमुळे पर्यावरण संरक्षण ही केवळ धोरणात्मक नव्हे तर वैयक्तिक जबाबदारी असल्याची जाणीव होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही अवकाशवीरांनी अंतराळ मोहिमांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याचा उल्लेख करत विज्ञान आणि मानवतेला सीमा नसल्याचे सांगितले. विविध देशांतील अवकाशवीर एकत्र काम करत असताना परस्पर विश्वास आणि सहकार्य हेच यशाचे आधार असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातील अंतराळ मोहिमा आणि पृथ्वीवरील हवामान कृती यासाठीही अशीच सहकार्याची वृत्ती आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला.

प्रश्नोत्तरांच्या सत्रात विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधन, पर्यावरण संरक्षण आणि करिअर संधींबाबत उत्सुकता व्यक्त केली. दोन्ही अवकाशवीरांनी विज्ञान, संशोधन आणि शाश्वततेकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. छोट्या सवयींमधून मोठा बदल घडवण्याची ताकद प्रत्येकात आहे, हा संदेश या संवादातून ठळकपणे समोर आला.

यावेळी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर म्हणाले की, राईट नाऊ’ असं काही नसतं, ‘राईट’ असतं आणि ‘नाऊ’ असतं. तुम्ही गोष्ट आत्ता करू शकता, किंवा योग्य प्रकारे करू शकता. पण दोन्ही एकत्र नेहमीच शक्य नसतात. आजच्या वेगवान, तत्काळ परिणामांच्या युगात संयम, तयारी आणि सातत्य यांचे महत्त्व आहे. हवामान बदलासारख्या गंभीर प्रश्नावर काम करताना प्रत्येक छोटा प्रयत्न महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले.

योग्य गोष्टीसाठी आत्ता पाऊल उचला, संयम आणि शिस्त स्वीकारा आणि परिणाम तात्काळ येणार नाहीत, पण प्रयत्न थांबवू नका असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी प्रास्ताविकात तीनही मान्यवरांचा परिचय करून दिला.

०००

नंदकुमार  वाघमारे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp