Pune | Sat, 14 February 2026

Ad

णमोकार तीर्थाच्या माध्यमातून मानवतेचा संदेश – मंत्री छगन भुजबळ

Sunil Goyal | 4 views
णमोकार तीर्थाच्या माध्यमातून मानवतेचा संदेश – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. 13 (जिमाका) : चांदवड तालुक्यातील मालसाणे येथे साकारण्यात आलेल्या णमोकार तीर्थाच्या माध्यमातून जगभर मानवतेचा संदेश पोहोचेल. या तीर्थामुळे नाशिकच्या वैभवात भर पडेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मंत्री श्री. भुजबळ यांनी आज दुपारी मालसाणे येथे साकारण्यात आलेल्या णमोकार तीर्थ क्षेत्राला भेट देत आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवात सहभाग घेतला. त्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुंथुसागर महाराज, चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, सुमेरसिंग काला, उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, णमोकार तीर्थ हे विकास आणि संस्काराचा सुंदर संगम आहे. अद्वितीय असे तीर्थक्षेत्र विकसित करण्यात आले आहे. आध्यात्मिक ऊर्जा देणारे केंद्र हे तीर्थक्षेत्र ठरेल. एवढेच नव्हे, मानवतेला दिशा देणारे आध्यात्मिक विद्यापीठ आहे. या तीर्थाला भेट देण्यासाठी देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने येतील. त्यातून जिल्ह्यात पर्यटन वाढण्यास मदत होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल. त्यामुळे नाशिकचा विकास होण्यास मोठी मदत होईल.

या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांसाठी स्मार्ट ऑडिओ गाइड व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे अध्यात्म आणि तंत्रज्ञान यांचा संगम साधला गेला आहे. णमोकार तीर्थाच्या माध्यमातून विश्वशांती, मानव कल्याण आणि अध्यात्मिक संदेश देत राहील, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. तत्पूर्वी मंत्री श्री. भुजबळ यांनी णमोकार तीर्थाची पाहणी केली.

***

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp