मुंबई, दि. ३ : आदिवासी समाजाच्या मागणीनुसार नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार’ असे नामांतर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या ३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये या नामांतरास मान्यता देण्यात आली.
२०१२ मध्ये राज्य शासनाने १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ५०० खाटांचे रुग्णालय नंदुरबार येथे सुरू करण्यास मंजुरी दिली होती. हे महाविद्यालय आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवेची गरज पूर्ण करणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
आदिवासी समाजाकडून दीर्घकाळ या संस्थेच्या नामांतराची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर शासनाकडे आलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजाचा गौरव वाढला असून, वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण व सेवेसाठी कार्यरत असलेल्या नंदुरबार महाविद्यालयाला नवी ओळख मिळाली आहे.
०००
हेमंतकुमार चव्हाण/वि.सं.अ/