Pune | Mon, 15 June 2026

Ad

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा

Sunil Goyal | 7 views
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा

मुंबई, दि. 13 – पावसाळ्यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन करताना रेल्वे, महापालिका, बेस्ट आणि, जिल्हाधिकारी कार्यालये, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणे यांनी सर्वसमावेशक आराखडा तयार करुन समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिल्या.

मुंबईतील रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या नालेसफाईच्या कामाचा व मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. शेलार यांनी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात समन्वय बैठक घेतली. या बैठकीला मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक हिरेश मीणा, पश्चिम रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक पंकज सिंग यांच्यासह मुंबई शहर आणि उपनगराचे जिल्हाधिकारी, महापालिका, रेल्वे, फायर ब्रिगेडचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले की, दुर्दैवाने पूर परिस्थिती निर्माण झाली तर ज्या रेल्वे स्टेशनवर गर्दी होईल अशा रेल्वे स्टेशनमधून गर्दी बाहेर काढणे, बाहेरच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवाशांना पाणी, अन्नपदार्थ देणे या एकूण परिस्थितीचा सर्वसमावेशक आराखडा तयार करा. तसेच दोन्ही प्राधिकरणाच्या सीसीटीव्ही आणि सूचना देणारी यंत्रणा, आपत्कालीन कक्ष यामध्ये समन्वय ठेवा. रेल्वे स्टेशनमधील आणि बाहेरील पादचारी पूल, वाहतुकीचे पूल, रेल्वे स्टेशन परिसरातील होर्डिंग या सगळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा. रेल्वे आणि महापालिका यांचे पंप यांचाही सर्वसमावेशक आराखड्यात सुव्यवस्थित समावेश करण्याच्या सूचना मंत्री शेलार यांनी केल्या. तसेच मस्जिद बंदर आणि परिसरातील रेल्वे हद्दीत येणाऱ्या व धोकादायक ठरलेल्या 24 इमारती आणि काही झोपड्या यांचे पुनर्वसन व तेथील रहिवासी याबाबत सविस्तर अहवाल तयार करुन शासनाकडे पाठविण्याच्या सूचनाही मंत्री ॲड. शेलार यांनी केल्या.

पश्चिम रेल्वेने सांगितले की, पाण्याचा निचरा करण्यासाठी चर्चगेट ते विरारदरम्यान एकूण 15 मायक्रो टनेल रेल्वे ट्रॅक खालून करण्यात आले असून या वर्षात 4 मायक्रो टनेल पूर्ण करण्यात आले आहेत. तर पाणी उपसण्यासाठी पंपांची संख्या वाढवून यावेळी 126 पंप बसवण्यात आले आहेत. 2400 वॅगन गाळ काढण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावरही पंपाची संख्या वाढवण्यात आली असून 220 पंप बसवण्यात आले आहेत. 350 किलोमीटर लांबीच्या मार्गावरील 160 नाले व गटारांची सफाई करण्यात आली आहे. दोन्ही मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत. यावेळी कांजूरमार्ग येथील उषानगर नाला आणि कुर्ला येथील ब्राह्मणवाडी नाल्याच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे करण्यात आल्याने पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकेल.

दरम्यान, दोन्ही रेल्वेचे सादरीकरण झाल्यानंतर मुंबई महापालिका आणि फायर ब्रिगेडने त्यांच्या काही सूचनाही केल्या. रेल्वे आणि महापालिका यामध्ये पूर्वीपेक्षा आता अधिक चांगल्या प्रकारे समन्वय होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp