Pune | Sun, 15 February 2026

Ad

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या ‘शौर्य व सेवा पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

Sunil Goyal | 12 views
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या ‘शौर्य व सेवा पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. २५ :- भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड व सुधारात्मक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या शौर्य व सेवा पदकांमध्ये महाराष्ट्रातील ८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’, उत्कृष्ट व विशिष्ट सेवेसाठी ६ अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पदक’, तसेच उल्लेखनीय सेवेसाठी विविध विभागांतील ५२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहेत. हे सन्मान महाराष्ट्राच्या पोलीस व सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे, शौर्याचे आणि जनतेप्रती असलेल्या सेवाभावाचे प्रतीक आहेत.

स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या अधिकारी व जवानांचा हा गौरव संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. विशेषतः वीरता पदक मिळविणाऱ्या जवानांनी दाखविलेल्या धैर्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा अधिक दृढ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुनश्च अभिनंदन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp