Pune | Tue, 17 March 2026

Ad

राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाची वास्तू समतेचे प्रतिक – मंत्री ॲड. आशिष शेलार

Sunil Goyal | 23 views
राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाची वास्तू समतेचे प्रतिक – मंत्री ॲड. आशिष शेलार

कोल्हापूर, दि. २१ (जिमाका): कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित वस्तुनिष्ठ संग्रहालय उभारण्यात आले आहे. ही वास्तू म्हणजे खऱ्या अर्थाने समतेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. त्यांच्या शेलार हस्ते या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम, खासदार छत्रपती संभाजी राजे, छत्रपती मालोजीराजे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, सहसंचालक डॉ. विलास वाहणे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इतिहास अभ्यासक प्रा.डॉ रमेश जाधव आदी उपस्थित होते.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले, छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे सर्व क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. राज्य सरकारने या स्मारकाला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे. कोल्हापूर शहर हे राष्ट्रीय इतिहास पर्यटनाचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत या स्मारकाच्या रिकाम्या जागेत तिसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरणाला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही ही त्यांनी याप्रसंगी दिली.

विदेशात असलेली जगदंबा तलवार लीजवर भारतात आणावी अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली. यावर उत्तर देताना ती तलवार आणण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी ‘भारतीय मराठा लष्करी भूप्रदेश’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस जतन व नियमायक समिती अंतर्गत असणाऱ्या वस्तूसंग्रहालय उप समितीतील सदस्यांचा मंत्री ॲड.  शेलार यांच्या हस्ते ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी राजर्षी शाहू सलोखा मंच आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दसरा चौक ते शाहू जन्मस्थळ दरम्यान ‘शाहू समता ज्योत’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी महेश जाधव, डॉ .मंजुश्री पवार, वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे, शाहू स्मारकचे व्यवस्थापक दत्तात्रय नागर, पॅलेसचे समन्वयक उत्तम कांबळे यांच्यासह अनेक शाहू प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp