Pune | Sun, 15 February 2026

Ad

राज्यात भरडधान्य आधारित उपक्रमांना गती देण्यासाठी विशेष कार्यदलाची आवश्यकता – कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी

Sunil Goyal | 6 views
राज्यात भरडधान्य आधारित उपक्रमांना गती देण्यासाठी विशेष कार्यदलाची आवश्यकता – कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी

मुंबई, दि. २७ : कमी पाण्यात तग धरणारे पीक म्हणजे तृणधान्य हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. निसर्गाच्या सान्निध्यात, तसेच कमी पाण्यात येणारी बाजरी, ज्वारी, नाचणी या भरडधान्यांच्या उत्पादनात राज्य आघाडीवर आहे. राज्यात दर्जेदार तृणधान्य- भरडधान्यांची  पेरणी ते विक्रीसाठी  बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी, भरडधान्य उत्पादन व विक्री समन्वयासाठी राज्यस्तरीय भरडधान्य टास्क फोर्स स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभाग आणि एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या कृषी विषयक एक दिवसीय कार्यशाळेत अपर मुख्य सचिव रस्तोगी बोलत होते. या चर्चासत्रात संशोधक, शेतकरी प्रतिनिधी, भरडधान्य क्षेत्रातील संबंधित तज्ज्ञ सहभागी झाले होते.

मोठे तृणधान्य म्हणजे ज्वारी व बाजरी आणि छोटे तृणधान्य म्हणजे नाचणी, भगर, राळ, कोद्रो, सावा, वरी, छोटा सावा तसेच छोट्या तृणधान्यांना विविध भागात नागली, मोर, भादली, कांगणी असे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. राज्यातील हवामान आधारित या भरडधान्य पिकांचा विस्तार कसा करता येईल, यावर सखोल चर्चा करण्यात आली. भरडधान्ये आणि इतर अनुषंगिक दुर्मिळ पिके उच्च पोषणमूल्ये असलेली सर्वांना माफक दरात उपलब्ध होणे गरजेचे आहे. भरडधान्यांपासून बनवलेल्या उत्पादनांची मागणी वाढावी भरडधान्यांपासून बनविलेल्या उत्पादनांना चव, रंग आणि सादरीकरण यांवर अधिक लक्ष दिले तर विशेषतः तरुण पिढीत या पोषणधान्यांची मागणी वाढू शकते.

अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची क्षमता विकसित करण्यासाठी शासन विविध प्रयत्न करत आहे. हवामानातील वाढती अनिश्चितता आणि मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भरडधान्य पिके विशेष महत्त्वाची आहेत. मात्र, मूल्यसाखळीतील अडचणी, दर्जेदार बियाण्यांचा अभाव, बाजारपेठेची अपुरी उपलब्धता तसेच ग्राहकांमध्ये कमी जागरूकता आणि मागणी या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शासनाचा टास्क फोर्स काम करणार आहे.

पोषणमूल्य असलेली भरडधान्य आहारात असणे गरजेची – डॉ. सौम्या स्वामिनाथन

भरडधान्ये ही पिके केवळ स्थानिक ठिकाणच्या हवामानाला अनुकूल अशी असून ही शाश्वत पिके आहेत. आपल्या आहारात आढळणाऱ्या अनेक पोषणतत्त्वांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी भरडधान्य मोलाची भूमिका बजावतात. एकीकडे आरोग्यासाठी उपयुक्त असलेली भरडधान्य लहान शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारी आहेत असे एमएसएसआरएफच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले. कुपोषण आणि लठ्ठपणाशी लढताना, भरडधान्ये आणि इतर पिकांमधून मिळणारी आहारातील विविधता प्रभावीपणे वापरली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

एमएसएसआरएफचे जैवविविधता संचालक डॉ. ई. डी. इस्रायल ऑलिव्हर किंग यांनी भरडधान्ये पिकांशी संबंधित प्रमुख आव्हाने व संधी अधोरेखित करत, हवामानातील असुरक्षितता, पोषण असुरक्षा आणि उपजीविका सक्षमता यावर मात करण्यातील त्यांची क्षमता स्पष्ट केली. हैदराबाद येथील भारतीय भरडधान्य संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. तारा सत्यवती आणि बाजरी संशोधक डॉ. पी. संजना रेड्डी यांनी भरडधान्य संशोधनातील प्रगती, सुधारित वाण यांची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय अर्ध-कोरडवाहू उष्णकटिबंधीय पिके संशोधन संस्था हैदराबाद येथील जीन बँकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वेत्रिवेंथन मणी यांनी दीर्घकालीन सक्षमतासाठी जैवविविधता संवर्धन, स्थानिक वाण आणि जनुकीय संसाधनांचे महत्त्व अधोरेखित केले. ओडिशा मिलेट मिशनचे माजी अधिकारी दिनेश बालम यांनी ओडिशातील भरडधान्य चळवळीतील संस्थात्मक नवकल्पना आणि समुदाय-आधारित उपक्रमांमधील अनुभव सांगितले.

या चर्चासत्रात महिला शेतकऱ्यांनी भरडधान्य शेती, बाजारपेठा आणि संसाधनांपर्यंत पोहोच यासंबंधीचा  वास्तव अनुभव कथन केला. संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभवाचा दृष्टीकोन महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च प्रोजेक्ट कोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड यांनी मांडला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत परभणीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. जी. पवार तसेच मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. एस. इंगोले यांनी स्थानिक परिस्थितीनुसार योग्य वाण, संशोधन,विस्तार व शेतकरी यांच्यातील महत्वाचे घटक व प्रत्यक्ष अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित केले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp