मुंबई, दि. ०३ : राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढविणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय विभागाने निर्गमित केला आहे. राज्यातील दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दिर्घकालीन उपाययोजना सुचविणे हा या समितीचा उद्देश आहे. सहकारी व खासगी दूध संघाकडून आलेल्या सूचनांवर समिती उपाययोजना सुचविणार असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
दुग्धविकास मंत्री अतुल सावे म्हणाले, अभ्यास समितीचे अध्यक्ष पशुसंवर्धन आयुक्त, असून, सदस्य सचिव म्हणून दुग्धव्यवसाय विकास आयुक्त हे आहेत. समिती राज्यातील दुग्धव्यवसायाच्या परिस्थितीचा आढावा घेईल. समितीच्या कार्यात “विकसित महाराष्ट्र २०४७” या उद्दिष्टांचा विचार केला जाईल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन विभाग म्हणून कामगिरी करण्यासाठी विविध राज्यांतील योजना अभ्यासून सर्वोत्तम योजना राज्यात राबविण्याचे मार्गदर्शन समिती करणार आहे.
ही अभ्यास समिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, दुग्ध उद्योगांचे प्रतिनिधी आणि प्रगतिशील दूध उत्पादक शेतकरी यांना आवश्यकतेनुसार आमंत्रित करेल. समितीच्या मार्गदर्शनाखाली महिलांना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच बचतगट शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, या बाबींचेही नियोजन केले जाणार असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
०००
शैलजा पाटील/वि.सं.अ/