शिर्डी, दि. ४ : “शासकीय सेवेत दाखल होणाऱ्या तरुणांसाठी ही संधी केवळ नोकरी नसून जनतेच्या सेवेसाठीची मोठी जबाबदारी आहे. या तरुणांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे, त्यांना दिलासा देण्याचे व प्रशासनावरील जनतेचा विश्वास दृढ करण्याचे काम करावे,” असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शासनाच्या कामकाजात ‘झिरो पेंडन्सी’ हा उपक्रम राबवून प्रत्येक विभागाचे काम अधिक लोकाभिमुख करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
लोणी येथे झालेल्या जिल्हास्तरीय नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस झालेले व अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या ३३८ उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले. यावेळी आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात तब्बल १० हजार तरुणांना शासकीय सेवेत दाखल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. “ही केवळ नियुक्ती नसून राज्याच्या विकासासाठी योगदान देण्याची संधी आहे. पूर्वी अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया क्लिष्ट व वेळखाऊ होती, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ती जलद, सुलभ व पारदर्शक करण्यात आली आहे. आता जिल्हाधिकारी स्तरावरच अनुकंपा नियुक्ती अधिकार दिल्याने जलद व पारदर्शक नियुक्ती प्रक्रिया पार पडणार आहे,” असे ते म्हणाले.
शासनाने आतापर्यंत सुमारे ५० हजार शासकीय पदे पारदर्शक पद्धतीने भरली आहेत, यात कुठेही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, हे अधोरेखित करताना त्यांनी नव्या पिढीला प्रशासनातील उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून काम करण्याचे आवाहन केले. तसेच, तरुणांनी आपल्या आई-वडिलांची काळजी घेण्याचे व त्यांचा सांभाळ करण्याचे कर्तव्यही विसरू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात आमदार काशिनाथ दाते यांनी शासनाने घेतलेला एकाच वेळी हजारो नियुक्त्या देण्याचा निर्णय स्तुत्य असल्याचे सांगितले. “या माध्यमातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अनुकंपा पदांचा अनुशेष भरला जाणार आहे. शासकीय नोकरी ही सेवा आहे, या भावनेने तरुणांनी कार्य करावे,”
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, या रोजगार मेळाव्याच्या यशासाठी सर्व विभागप्रमुखांनी एकत्रितपणे मेहनत घेतली असून, यातून अनेक बेरोजगार युवकांना शाश्वत रोजगार मिळणार आहे. “प्रशासनात दाखल होणारे हे तरुण सचोटीने काम करून आपल्या राज्याच्या विकासात निश्चितच मोलाचे योगदान देतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या राज्यस्तरीय अनुकंपा आणि लिपिक नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांसाठी एमपीएससीमार्फत १६० आणि अनुकंपा तत्त्वावर १७८ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले.
या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात २१ उमेदवारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी रोजगार मेळाव्याच्या मागील पार्श्वभूमी व जिल्हास्तरावर केलेल्या तयारीची माहिती दिली.