Pune | Thu, 19 February 2026

Ad

सर ज. जे. रुग्णालय येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे लोकार्पण

Sunil Goyal | 1 views
सर ज. जे. रुग्णालय येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे लोकार्पण

मुंबई, दि. १८: महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई येथील सर जे. जे. रुग्णालय समूहात विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या सुविधा रुग्णसेवेची गुणवत्ता वाढविण्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक व नैदानिक प्रशिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

समारंभात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णसेवा बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांच्या उपचाराच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल, असे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण विभागाचे मुख्य ध्येय गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासोबत उत्कृष्ट व परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

उद्घाटन समारंभास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार मनोज जमसुतकर, प्रधान सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी तसेच वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अधिष्ठाता डॉ. अजय भांडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. रंजीत मानकेश्वर, उपअधिष्ठाता (पदव्युत्तर विभाग) डॉ. गजानन चव्हाण आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या समन्वयातून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रमुख सुविधा

१. अत्याधुनिक न्यूरोसर्जरी ऑपरेशन थिएटर

मेंदूतील गाठी (ब्रेन ट्यूमर) व आघातजन्य शस्त्रक्रिया

मेंदूतील रक्तस्राव व मणक्यांशी संबंधित विकारांवरील उपचार

गंभीर डोक्याच्या दुखापतींचे आपत्कालीन व्यवस्थापन

सुरक्षित न्यूरोसर्जिकल हस्तक्षेपासाठी आधुनिक तंत्रज्ञान

२. ईएनटी (कान-नाक-घसा) ऑपरेशन थिएटर

कान, नाक व घसा विकारांवरील शस्त्रक्रिया

टॉन्सिलेक्टॉमी शस्त्रक्रिया

कर्णपटल दुरुस्ती

आपत्कालीन ईएनटी सेवा

३. बाल शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर

अर्भक व बालकांसाठी विशेष शस्त्रक्रिया सेवा

जन्मजात विकृतींचे सुधारात्मक उपचार

हर्निया व अस्थिरोग विषयक शस्त्रक्रिया

बालस्नेही पायाभूत सुविधांसह आपत्कालीन सेवा

४. वॉर्ड क्रमांक ११ व १८ चे आधुनिकीकरण

वैद्यकीय व शस्त्रक्रिया रुग्णांसाठी सुधारित सुविधा

शस्त्रक्रियेपूर्व व शस्त्रक्रियेनंतरची सेवा अधिक सक्षम

निरीक्षण, तपासणी व पुनर्वसनासाठी सुसज्ज व्यवस्था

५. केंद्रीय निर्जंतुकीकरण सेवा विभाग (सीएसएसडी)

शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणांचे प्रगत निर्जंतुकीकरण

संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण प्रणाली बळकट

ऑपरेशन थिएटरसाठी निर्जंतुक साहित्य पुरवठा

रुग्णालयीन स्वच्छता व सुरक्षिततेत वाढ

६. रक्तपेढी आधुनिकीकरण

रक्त साठवण व वितरण अधिक सक्षम

आपत्कालीन रक्तपुरवठा उपलब्धता

रक्त तपासणी व घटक विभाजन सुविधा

रक्तदात्यांच्या नोंदणी व प्रक्रियेत सुधारणा

७. शैक्षणिक व प्रशिक्षण सुविधा

७ वा मजला सभागृह — शैक्षणिक कार्यक्रम, परिसंवाद व संस्थात्मक उपक्रम

C.B.M.E. स्किल लॅब — सिम्युलेशन आधारित आधुनिक वैद्यकीय प्रशिक्षण

वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

०००

निलेश तायडे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp