समाजामध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे व तरुण पिढीला रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांच्यामध्ये रक्तदानाबद्दल जागृती निर्माण करणे, स्वैच्छिक रक्तदानाची संकल्पना रूढ करणे यासारख्या समाजोपयोगी उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस’ दरवर्षी १ ऑक्टोबरला साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्वैच्छिक रक्तदानाबद्दल ही माहिती.
एकविसाव्या शतकात मानवाने आजपर्यंत विज्ञान, आरोग्य, शेती तंत्रज्ञान, औद्योगिक, आधुनिक तंत्रज्ञान, इ.आदी क्षेत्रात भरपूर प्रगती केली आहे. मात्र मानवी रक्ताला दुसरा पर्याय शोधण्यात आजपर्यंत मानवाला अथवा विज्ञानाला यश मिळाले नाही. यासाठी माणसाचा जीव वाचविण्यासाठी माणसाचेच रक्त लागते. यासाठी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान जनजागृतीपर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था, महाराष्ट्र शासन, राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्था, औद्योगिक क्षेत्र, महाविद्यालय (एन.एस.एस.आणि एन.सी.सी) आदिंच्या माध्यमातून स्वैच्छिक रक्तदान मोहीम जनजागृतीपर यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.
राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस सर्वप्रथम 1 ऑक्टोबर 1975 या दिवशी इंडियन सोसायटी आँफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँण्ड इम्यूनो हिमँटोलाँजी या संस्थेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँण्ड इम्यूनो हिमॅटोलॉजी या संस्थेची स्थापना 22 ऑक्टोबर 1971 या दिवशी के.स्वरुप क्रिशेन आणि डॉ. जे.जी. ज्वाली यांनी केली. जागतिक आरोग्य संघटना, रेडक्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटी, इंटरनॅशनल फेडरेशन आँफ ब्लड डोनर ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन यांनी सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादकांच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि स्वैच्छिक रक्तदान करून रक्तदान महायज्ञात रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या ‘स्वैच्छिक रक्तदाता’ म्हणून या मोहिमेत सामील झालेल्या रक्तदात्यांचे आभार मानले पाहिजे. हा कार्यक्रम प्रथमच 2004 मध्ये चार प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थाद्वारे आयोजित करण्यात आला होता. याला यावर्षी 21 वर्षे पूर्ण होत आहेत.
दरवर्षी आपण राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस साजरा करीत असतो. समाजामध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवणे तरुणपिढीमध्ये रक्तदानाबद्दल जागृती निर्माण करणे. प्रोफेशनल डोनर व बदली रक्तदाता ही संकल्पना कालबाह्य करून स्वैच्छिक रक्तदानाची मुहूर्तमेढ रुजवणे निरोगी व तंदुरुस्त असताना देखील जे लोक रक्तदान करीत नाहीत त्यांना रक्तदानासाठी प्रेरणा देणे हा यामागचा हेतू आहे. राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस हा दरवर्षी 1 ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो. याशिवाय संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये रक्तदानासंबंधीच्या विविध उपक्रमाचे आयोजन रक्तपेढ्यामार्फत व शासनामार्फत करण्यात येते. चालू वर्षी 2025 चे घोषवाक्य ‘रक्तदान करूया, आशा जागवूया, एकत्रित येऊन जीवन वाचवूया’ असे आहे.
दानाचे महत्त्व
दानाचे महत्त्व आपणा सर्वांनाच ठाऊक आहे यामध्ये अन्नदान, कन्यादान या परंपरागत दानांबरोबरच शास्त्रीय पद्धतीची दाने. उदा. देहदान, अवयदान, नेत्रदान व रक्तदान ही देखील आपण समजून घेतले पाहिजेत. कारण रक्तदान ही काळाची गरज बनली असून रक्ताच्या निर्मितीला अद्यापही मानवाला पर्याय निर्माण करता आलेला नाही.
मानवी शरीरात अंदाजे 5.5 रक्त असते. रक्तामध्ये काही घटक असतात. उदा. तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका, प्लाजमा इत्यादी. संपूर्ण शरीरभर ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम रक्त करते. रक्तामधील महत्त्वाचा घटक हिमोग्लोबिन असतो. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास एनिमिया (पंडू रोग) होतो. रक्ताचे विविध आजार मानवांत पाहायवास मिळतात. उदा. ॲनिमिया, थॅलिसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, ल्युकेमिया, प्लेटलेटचे आजार, कॅन्सर इत्यादी रक्ताशी निगडित काही आजारामध्ये वारंवार रक्त संक्रमण करावे लागते आणि इथेच रक्तदानाचे महत्त्व लक्षात येते. या रक्तदानासंबंधी अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. संदेश यमलवाड यांनी विस्तृत माहिती दिली.
रक्तदान म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या संमतीने एखाद्या रक्तपेढीत किंवा रक्तदान शिबिरात रक्त देणे म्हणजेच रक्तदान रक्तदान हे स्वैच्छिक असले पाहिजे व कोणत्याही मोबदल्यात रक्तदान करणे, बदली रक्तदाता होणे या रक्त दात्याच्या संकल्पना कालांतराने पुसट करून स्वैच्छिक रक्तदानाची मोहीम जनमानसात रुजवणे हेच या रक्तदान दिवसाचे महत्त्व असते. ज्या माणसाचे वय 18 ते 60 वर्ष, हिमोग्लोबिन 12.5 पेक्षा जास्त, वजन 45 किलो पेक्षा जास्त नाडीचे ठोके 80 ते 100 प्रतिमिनिट, तापमान 37.5 रक्तदाब नियमित व जर आधी रक्तदान केले असेल तर 3 महिने पूर्ण झालेल्या कालावधी इत्यादी घटक जो रक्तदाता पूर्ण करतो तोच रक्तदान करू शकतो.
रक्तदान का करावे
दान केल्याचे समाधान मिळते. शरीरात रक्त निर्मितीस चालना मिळते. रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. कर्करोग किंवा हृदयरोगासारख्या आजारांच्या धोक्याचे प्रमाण कमी होते. शरीरातील 5.5 रक्तामधून 350 ते 450 मिली रक्त एका रक्तदानात दान करता येते. हे रक्त 24 तासात भरून निघते तसेच हिमोग्लोबिन व रक्त घटक दोन महिन्यात पूर्वपदावर येतात. रक्तदान केल्याने काही अपाय होईल का अशी अनामिक भीती काहीच्या मनात असते. परंतु रक्तदानाने तोटा काहीच नसून रक्तदानाचे फायदेच अधिक आहेत. कोणत्याही शासनमान्य रक्तपेढीत व रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते असेही डॉ. संदेश यमलवाड यांनी सांगितले.
नवजात लहान बालके, प्रसुतीपूर्व प्रसवणाऱ्या व प्रसुतीपश्चात माता. अपघात किंवा युद्धात झालेल्या अतिरक्तस्त्रावानंतर रक्ताशी निगडित अनुवंशिक आजारामध्ये (उदा. थॅलीसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, ॲनिमिया) साथीच्या रोगाचे रुग्ण (उदा. मलेरिया, डेंग्यू), रक्तघटकांशी निगडित आजारीत रुग्ण, जडीत रुग्ण प्रथिनांची कमतरता असणारे रुग्ण, डायलिसिस चे रुग्ण, कॅन्सरचे रुग्ण यांच्यासाठी रक्तदान करता येते. रक्तदान ही एक सामाजिक संकल्पना म्हणून रुजवली गेली पाहिजे युवक युवतींनी रक्तदानाचे महत्त्व समजून घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केले पाहिजे. आपण वर्षातून चार वेळेस दर तीन महिन्याच्या अंतराने रक्तदान करू शकतो. रक्तदानानंतर प्रत्येक शासकीय रक्तपेढी तर्फे एक रक्तदाता कार्ड देण्यात येते. ज्यावर अडचणीच्या प्रसंगी कोणत्याही शासकीय रक्तपेढीतून रक्त साठ्याच्या उपलब्धतेनुसार एक रक्तपिशवी मोफत देण्यात येते. या कार्डची वैधता दोन वर्षापर्यंत असते. रक्तदानानंतर प्रत्येक रक्त पिशवीची रक्तपेढीत तपासणी करून (एचआयव्ही, एचबीव्ही, एचसीव्ही, (कावीळ), सिफीलीस व मलेरिया) तपासणीअंती निर्दोष असणारी रक्तपिशवीच रक्तपेढ्यांतर्फे रुग्णांना वितरित केली जाते. आता वैज्ञानिक उत्क्रांतीमुळे रक्तातील घटक देखील वेगळे करून गरजेनुसार रुग्णांना देता येऊ शकते. (उदाहरणादाखल – तांबड्या रक्तपेशी, थैलीसीमिया रुग्ण रक्तबिंबिका-डेंग्यू मलेरियाचे रुग्ण प्लाजमा-जळीत रुग्ण लिव्हरचे आजार, फॅक्टर 8 व 9 हिमोफिलिया रुग्ण.)
रक्तदानाची उपयोगिता
ए, बी, ओ, एबी हे मूलभूत रक्तगट असून प्रत्येकाचे पॉझिटिव्ह व निगेटिव्ह असे प्रकार पडतात. त्यापैकी ‘ओ’ निगेटिव्ह हा युनिवर्सल रक्तदाता असून एबी पॉझिटिव्ह हा युनिव्हर्सल रक्त घेणारा या प्रकारात मोडतो. वैज्ञानिक संशोधनामुळे अजूनही रक्तगटाचा अभ्यास होऊन रक्तगटाचा शोध लागला आहे, लागत आहे. रक्त कधी आणि कोणाला लागेल, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे रक्तदानाबद्दल नियमित जनजागृती करून रक्तदान चळवळीला सर्वांनीच हातभार लावण्याची गरज आहे.
निगेटिव्ह ग्रुपच्या रक्तदात्यांचे रक्त नेहमी राखीव ठेवल जाते. त्यातल्या त्यात एबी निगेटिव्ह हे अत्यंत दुर्मिळ रक्तगट आहे. त्यासाठी गरज पडेल तसे एबी निगेटिव्ह रक्त दात्यांना रक्त केंद्रात बोलावल जाते आणि रक्तदान करण्यास मदत करावयास सांगितले जाते. मानवी शरीरात कमीत कमी पाच लीटर रक्त असते. शरीरातील पाच लिटर रक्तापैकी ४५० किंवा ३५० मिली रक्त घेतले जाते. ते रक्त २१ दिवसात शरीरात पुन्हा तयार होते. त्याच रक्तदात्याकडून पुन्हा रक्तदान करावयाचे असल्यास 90 दिवस अंतर ठेवूनच रक्तदान करावे, असे कायदे आहेत. रक्तदात्याचे किमान वजन ४५ पेक्षा जास्त असावे. १८ ते ६५ वर्ष या वयोगटातील कोणालाही रक्तदाता होता येते. मात्र त्याच्या शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ ग्रॅम पर डेसीलिटर पेक्षा जास्त असावे. निरोगी मनुष्य दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकतो. जर तो मद्यपी असेल तर मद्यपानानंतर ४८ तासांनी रक्तदान करू शकतो. महिला मासिक पाळीचा काळ वगळता नियमित रक्तदान करू शकतात. मात्र हिमोग्लोबीनचे प्रमाण हे १२.५ ग्रॅम पेक्षा अधिक असावेत. प्रसुतीनंतर एक वर्षभर रक्तदान करता येत नाही. मानवी शरीरात ३५ हून अधिक रक्त समूह प्रणाली आढळली आहे. त्यातील एबीओ आणि आर एच रक्त समूह प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे.अनेक प्रकारचे रक्तगट आहेत. ते सर्वत्र उपलब्ध रहाण्याकरता रक्त देवाण-घेवाण अखंडपणे कार्यरत असणे अत्यावश्यक असते. रक्त शिबिरे यांचे समान वाटप जिल्ह्यात करण्यात आले पाहिजे. जेणेकरून रक्त तस्करी म्हणजेच रक्त आणि रक्त घटके वितरण व्यवसाय होणार नाही. राष्ट्रीय रक्त धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले गेले पाहिजे. शासकीय रक्तपेढी ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापित करून ती अधिक सक्षम करण्यात यावी, जेणेकरून निःशुल्क वितरण सर्वांना मिळेल. याचा फायदा सर्वसामान्य गरजू रूग्णांना होईल व अनेकांना जीवदान मिळू शकेल.
सक्रीय सहभाग महत्त्वाचा
समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून निःस्वार्थीपणे, समाजहितासाठी, राष्ट्रसेवा म्हणून रक्तदान महत्त्वाचे. ऐच्छिक रक्तदाता म्हणून व्हॉट्सअप ग्रुप, सोशल मीडिया, डिजिटल माध्यमातून रक्तदान शिबीर तसेच रक्तदाता नोंदणी संपर्क अभियान राबवून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होऊ शकते. रक्तदान अभियान राबविण्यात येणाऱ्या आरोग्य सेतू पोर्टल https://eraktkosh.mohfw.gov.in/ या वेबसाईटवर रजिस्टर नोंदणी करून ऐच्छिक रक्तदान करुन रक्तदानाबद्दल ऑनलाईन रक्तदान प्रमाणपत्र देता येते. या रक्तदान मोहिमेत आपणही सहभागी होऊन आपण रुग्णांचे प्राण वाचविण्याचे पवित्र काम करु शकता. अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था आणि सामान्य माणसांनीही रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे यायला हवे. त्यामुळेच देशात आवश्यक तेवढा रक्तसाठा उपलब्ध होईल. रक्तदान हे महान कार्य आहे तसेच मानवी रक्ताची गरज कधीही न संपणारी असल्यामुळे रक्तदानाविषयी प्रेरणा समाजात द्दढ करणे, निरोगी रक्तदात्यांची फौज उभी करून रक्तदात्यांमध्ये ऐच्छिक रक्तदानाविषयी जनजागृती करणे, सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदात्यांविषयी कृतज्ञता निर्माण व्हावी, या मागचा एवढाच उद्देश.
अनिल आलुरकर
उपसंचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय, अमरावती