मुंबई, दि. ३० : महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींसह औद्योगिक धोरणांची संपूर्ण माहिती तसेच औद्योगिक जमीन बँक, क्लस्टर, प्रकल्प तपशील आदी बाबींची माहिती सुलभरित्या उपलब्ध करुन देणाऱ्या उद्योग विभागाच्या https://industry.maharashtra.gov.in या अद्ययावत संकेतस्थळाचे अनावरण उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अनबलगन, सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार तसेच उद्योग विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हे नवीन संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी अधिक सुलभ करण्यात आले आहे. या संकेतस्थळामुळे महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या संधी व औद्योगिक धोरणांची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. औद्योगिक जमीन बँक, क्लस्टर व प्रकल्प तपशील एका क्लिकवर दिसणार आहे. एमएसएमई सहाय्य, योजना व अनुदान यांचा पारदर्शक तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सिंगल विंडो प्रणालीद्वारे ऑनलाईन सेवा व जलद प्रक्रिया यांचा दुवा देखिल उपलब्ध असेल. उद्योजक, गुंतवणूकदार व उद्योग क्षेत्रातील प्रत्येकासाठी हे संकेतस्थळ एक उपयुक्त मंच ठरेल.
या संकेतस्थळावर विविध जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये उद्योग संचालनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र खादी आणि ग्रामोद्योग मंडळ, शासकीय मुद्रण, लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तसेच महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (मैत्री) आदी कार्यालयांच्या जलद दुव्यांचा समावेश आहे.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/