Pune | Wed, 18 February 2026

Ad

उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात आता विनामूल्य डायलिसिस सुविधा

Sunil Goyal | 47 views
उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात आता विनामूल्य डायलिसिस सुविधा

यवतमाळ, दि. १ : (जिमाका) यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे  उमरखेड येथील ८ खाटांच्या मोफत डायलिसिस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

यामुळे उमरखेड आणि लगतच्या परिसरातील किडनी (मूत्रपिंड) आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध होणार असल्याने दिलासा  मिळेल, असा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.

उमरखेड तालुक्यात कार्यरत असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात हे अत्याधुनिक डायलिसिस सेंटर स्थापन करण्यात आले आहे. परिसरातील रुग्णांची वाढती संख्या आणि उपचारांची गरज लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले की, “या मोफत डायलिसिस सेंटरमुळे उमरखेड परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुलभ होणार आहे. आतापर्यंत रुग्णांना उपचारांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते, ज्यामुळे त्यांना प्रवासाचा मोठा ताण सहन करावा लागत होता आणि उपचारांवरील आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. आता हे मोफत केंद्र सुरू झाल्यामुळे नागरिकांचा हा त्रास दूर होईल आणि त्यांना वेळेवर व सोयीस्कर मोफत उपचार मिळतील.”

याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. विकास मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व परिचारिका उपस्थित होत्या. तसेच, उमरखेड येथे आमदार श्री. किसन वानखेडे, भाजपचे जिल्हा समन्वयक श्री. नितिन भुतडा, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मांडण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. डोंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे, श्री. चितंगराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp