Pune | Sat, 11 October 2025

Ad

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एईडी डीफ्रेबिलिटर्स, स्टेमी उपकरणांचे लोकार्पण

Sunil Goyal | 25 views
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एईडी डीफ्रेबिलिटर्स, स्टेमी उपकरणांचे लोकार्पण

मुंबई दि. ३० : आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सर्वांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, तणाव कमी करणे आणि नियमित तपासण्याद्वारे आपण हृदयरोगापासून आपला बचाव करु शकतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती कक्षात ट्रायकॉग हेल्थ इंडिया या संस्थेच्या वतीने मंत्रालयातील दवाखान्यासाठी देण्यात आलेल्या ५ एईडी डीफ्रेबिलिटर्स आणि स्टेमी उपकरणाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, ट्रायकॉग हेल्थ इंडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चरित भोगराज, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, ट्रायकॉग हेल्थ इंडियाचे परेश शिंदे, राजीव दास, उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ. संतोष भोसले, मंत्रालयातील क्लिनिकचे डॉ. प्रमोद निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे १८ दशलक्ष लोक हृदयरोगामुळे मृत्यू पावतात. भारतातही ही समस्या गंभीर आहे. वाढती व्यसनाधीनता, तणाव, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाला तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे आणि त्याला जीवनदान देणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आज लोकार्पण झालेल्या या उपकरणांचे विशेष महत्त्व आहे. मंत्रालयात कार्यरत असणाऱ्या ४ हजार कर्मचाऱ्यांपैकी एखाद्याला हृदयविकाराचा त्रास झाल्यास या उपकरणामुळे निश्चितच जीवनदान मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्रालयातील दवाखान्याचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. ईसीजी व रक्त तपासणीसाठी रुग्णांना मंत्रालयाबाहेर जाण्याची गरज भासू नये, यासाठी आरोग्य विभागाने व्यवस्था करावी. त्यासाठी आवश्यक साधनसामुग्रीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

ट्रायकॉग हेल्थ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चरित भोगराज यांनी यावेळी स्टेमी उपकरणासंदर्भात सादरीकरण केले. उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांनी सूत्रसंचलन केले.

०००

देवेंद्र पाटील/जसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp