Pune | Fri, 10 April 2026

Ad

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना’तून नागरिकांमध्ये शासनाबाबत विश्वासनिर्मिती – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Sunil Goyal | 1 views
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना’तून नागरिकांमध्ये शासनाबाबत विश्वासनिर्मिती – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १० : नागरिकांच्या अडचणी एकाच छताखाली सोडविणे हा राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा उद्देश आहे. हा अभिनव उपक्रम असून शासन, प्रशासन आणि जनतेतील दुवा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. लोकांच्या मनात शासन व प्रशासनाबद्दल विश्वास दृढ करण्यासाठी राज्य शासन स्वतः लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या या प्रयत्नांना नक्कीच बळ मिळेल, असा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व’ अभियानांतर्गत ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या मराठी शाळा क्र. २ येथे समाधान शिबिर उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाले. यावेळी कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार सुनील शिंदे, आमदार विजय चौधरी, सह आयुक्त (करमणूक कर) रवींद्र पवार, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पवन तापडिया आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शिबिरामागील उद्दिष्टे स्पष्ट केली. त्यांनी ‘वन डे डिलिव्हरी’ या संकल्पनेवर भर दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना एका दिवसात सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. अर्ज स्वीकारून त्यावर तत्काळ कार्यवाही करून प्रत्यक्ष लाभ देणे, हे प्रशासनाचे ध्येय असून या शिबिरातून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे, असे जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांनी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी कौशल्य मंत्री लोढा यांनी शिबिराला भेट देत उपक्रमाची पाहणी केली.

समाधान शिबिरात विविध विभागांचे ४० स्टॉल्स

या समाधान शिबिरात महसूल विभागासह राज्य शासनाच्या विविध विभागांचे सुमारे ४० स्टॉल्स उभारण्यात आले होते. उत्पन्न दाखला, जात दाखला, अधिवास दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र आदी विविध दाखल्यांचे अर्ज भरून त्याच ठिकाणी वितरण करण्यात आले. शिधापत्रिकेसंदर्भातील नाव समावेश, वगळणे तसेच नवीन शिधापत्रिका देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. तसेच, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांसारख्या सामाजिक योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. आधार नोंदणी व दुरुस्ती, कामगार, महिला व बाल कल्याण, समाज कल्याण, टपाल, विधी व न्याय, शिक्षण विभाग तसेच विविध महामंडळांच्या योजनांबाबत यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून येथील विविध सेवांचा लाभ घेतला. एकाच दिवसात अर्ज स्वीकृतीपासून दाखले वितरणापर्यंतची प्रक्रिया त्वरेने पूर्ण केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थी, महिला, दिव्यांग तसेच उपस्थित नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे अर्ज भरून त्याची तिथेच पूर्तता करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते दाखले वाटप करण्यात आले.

कामगार विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, समाज कल्याण विभाग, टपाल विभाग, विधि व न्याय विभाग, शिक्षण विभाग, आर्थिक विकास महामंडळ, नशाबंदी महामंडळ अशा विविध विभागांमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांबद्दलची माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली.

0000

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp