
मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांत “राज्यातील वाचन संस्कृतीचा प्रसार आणि ग्रंथालय चळवळीचे बळकटीकरण” या विषयावर ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातील ही मुलाखत शुक्रवार, 27, शनिवार 28, सोमवार 30, मंगळवार 31 मार्च तसेच 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही ही मुलाखत उपलब्ध राहणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, 31 मार्च 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होईल. याशिवाय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत पाहता येणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका सुचेता गरूडे यांनी केले आहे.

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे जाळे अधिक सक्षम करणे, डिजिटल युगाशी सुसंगत ई-लायब्ररी सेवा सुरू करणे, वाचनालयांचे आधुनिकीकरण करणे आणि ग्रामीण भागापर्यंत वाचन संस्कृती पोहोचविणे यासाठी ग्रंथालय संचालनालय विविध उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील वाचन संस्कृतीला अधिक चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ आयोजित करण्यात येत आहेत. त्याअनुषंगानेच मुंबई शहर जिल्ह्याचा ‘ग्रंथोत्सव’ 27 व 28 मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असून, या माध्यमातून वाचन चळवळीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडी, चर्चासत्रे, परिसंवाद, कथाकथन, व्याख्याने, ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रम, कवी संमेलन यांसारख्या विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष मुलाखतीत शासनाच्या विविध अनुदान योजना, ग्रंथालय नोंदणी प्रक्रिया, वाचनालयांना दिले जाणारे तांत्रिक व आर्थिक सहाय्य, तसेच बालक, युवक आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या वाचन प्रेरणा उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांनी, विशेषतः युवक व विद्यार्थ्यांनी, ग्रंथालयांचा अधिकाधिक उपयोग करून ज्ञानसमृद्ध समाजनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन गाडेकर यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून केले आहे.
0000
जयश्री कोल्हे/स.सं
