Pune | Fri, 17 April 2026

Ad

‘एकाच छताखाली’ सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

Sunil Goyal | 2 views
‘एकाच छताखाली’ सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

मुंबई, दि. १६: राज्यातील एकल महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ सुलभ आणि एकत्रित स्वरूपात मिळावा यासाठी कार्यप्रणाली तयार करावी. एकल महिला धोरणाची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तातडीने तयार करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

एकल महिलांच्या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत सचिव अनुप कुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वि. रा. ठाकूर, उपायुक्त गिरासे, उपसचिव भोंडवे तसेच अवर सचिव कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ ‘एकाच छताखाली’ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करा. त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून, एकल महिलांची नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

एकल महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष हेल्थ कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विविध ठिकाणी जनजागृती व सेवा शिबिरे घेऊन अधिकाधिक महिलांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यावर भर देण्यात येणार आहे.

या सर्व उपक्रमांमुळे राज्यातील एकल महिलांचे सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षमीकरण होण्यास मोठी चालना मिळणार आहे.

००००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp