Pune | Sat, 14 February 2026

Ad

‘हिंद-दी-चादर’ ३५० वा शहीदी समागम; विविध उपक्रमांतून जनजागृती करा

Sunil Goyal | 3 views
‘हिंद-दी-चादर’ ३५० वा शहीदी समागम; विविध उपक्रमांतून जनजागृती करा

सिंधुदुर्गनगरी दि. १२ (जिमाका):- शीख धर्माचे नववे गुरू ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्यभर विविध गौरवशाली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक वर्षानिमित्त त्यांचा त्याग, शौर्य व मानवतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम, स्पर्धा व प्रचार-प्रसिद्धी उपक्रम राबविण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले.

नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, शिक्षणाधिकारी कविता शिंपी, तहसीलदार चैताली सावंत आदी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हास्तरावर जनजागृतीसाठी निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील उपक्रम तसेच माहितीपर प्रदर्शनांचे आयोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानातून मिळणारा धार्मिक सहिष्णुता, मानवता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजात अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना व विविध शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवून या ऐतिहासिक वर्षानिमित्त व्यापक जनजागृती घडवून आणावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी केले.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp