
मुंबई, दि.20 : श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्ताने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात ‘हिंद-दी-चादर’ या नृत्य नाट्य, गीतांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 21 मार्च 2026 रोजी अकोला येथे प्रमिलाताई ओक सभागृहात सायंकाळी 7 वाजता तसेच 22 मार्च 2026 रोजी सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर, नागपूर येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचे जीवनकार्य संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच त्यांना ‘हिंद-दी-चादर’ (हिंदुस्थानचे रक्षण करणारी ढाल) असेही संबोधले जाते. म्हणूनच श्री गुरू तेग बहादुर साहेबजी यांच्या शहीदीच्या 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त श्री गुरू तेग बहादुर यांच्या बलिदानाची आठवण ठेवणे, त्यांच्या विचारांचा प्रसार करणे तसेच समाजात एकता, बंधुता आणि आध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन करणे असा या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश, जो विविध धर्म, संप्रदाय व समाजघटकांना एकत्र आणणारा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार आहे.
राज्यात आठ ठिकाणी आयोजन
पंजाबी भक्ती गीत, भांगडा नृत्य आणि नाट्यमय प्रसंग अशा कलाविष्कारांनी युक्त 60 कलावंतांनी साकारलेला हा सांस्कृतिक सोहळा आहे. या ‘हिंद-दी-चादर’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे राज्यात आठ ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. वाशी, मिरा रोड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगांनंतर आता अकोला, नागपूर, नाशिक आणि पिंपरी चिंचवड येथे हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
हा सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असून नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य शासन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभाग संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
0000
संजय ओरके/विसंअ
