Pune | Sun, 12 April 2026

Ad

‘तणाव हीच ताकद’ कार्यालयीन तणाव व्यवस्थापनावर परिसंवादात मंथन

Sunil Goyal | 3 views
‘तणाव हीच ताकद’ कार्यालयीन तणाव व्यवस्थापनावर परिसंवादात मंथन

नवी दिल्ली, दि. ११:  प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 आयोजित परिसंवादात कार्यालयीन तणाव, आव्हाने आकलन, कारणे आणि परिणामकारक उपाय या विषयावर सखोल मंथन करण्यात आले.

या परिसंवादात विविध मान्यवरांनी तणाव व्यवस्थापन, वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील संतुलन आणि मानसिक आरोग्य याबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले. भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी मोक्षदा पाटील यांनी स्त्रिया आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या अचूकतेने पार पाडतात, असे नमूद करत प्रशासनिक सेवेत तणाव कमी करण्यासाठी वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक मैत्रीचे संबंध असणे आवश्यक असल्याचे सांगितले. भारतीय विदेश सेवेतील अधिकारी प्रियंका जावळे यांनी तणाव हा वैयक्तिक तसेच कार्यालयीन दोन्ही स्तरांवर निर्माण होऊ शकतो, पण त्याला आपल्या कौशल्याने सहज दूर करता येतो असे स्पष्ट केले.

भारतीय वित्त सेवतील अधिकारी क्रांती खोब्रागडे यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक असल्याचे सांगत विद्यमान नियमांचे योग्य पालन केल्यास प्रशासन अधिक प्रभावी होऊ शकते, असे मत व्यक्त केले. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मोनिका सिंग, यांनी स्त्रियांच्या स्वभावात संवेदनशीलता अंगभूत असते, असे नमूद करत शारीरिक तंदुरुस्तीमुळे मानसिक आरोग्य सुदृढ राहते आणि तणावमुक्त जीवन जगता येते, असे सांगितले. त्यांनी तणाव हीच आपली ताकद ठरू शकते, असा सकारात्मक दृष्टिकोन मांडला.

या परिसंवादातून तणाव व्यवस्थापनासाठी सकारात्मक विचारसरणी, वैयक्तिक संतुलन आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ अधिकारी वर्षा कोटे व झी 24 तासचे पत्रकार उर्वर्शी खोना यांनी केले.

०००

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp