Pune | Mon, 06 April 2026

Ad

‘वाचनाची गोडी वाढवा, पुस्तकाला मित्र बनवा’ मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभात मान्यवरांचे आवाहन

Sunil Goyal | 10 views
‘वाचनाची गोडी वाढवा, पुस्तकाला मित्र बनवा’  मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभात मान्यवरांचे आवाहन

मुंबई, दि.२७ : ज्ञान, संस्कार आणि प्रेरणा देणारे प्रत्येक पुस्तक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. पुस्तकांशी मैत्री केल्यास कधीच एकटे वाटत नाही. वाचनाची सवय आपल्याला आयुष्यभर साथ देणारी आणि यशाच्या मार्गावर पुढे नेणारी असल्याने विद्यार्थ्यांसह सर्वांनीच वाचनात गोडी वाढवून पुस्तकाला मित्र बनवावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सवच्या उद्घाटन समारंभात मान्यवरांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर (पूर्व) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे दोन दिवशी मुंबई शहर ग्रंथोत्सव-२०२५ आयोजन करण्यात आले आहे.

या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन लेखक, चित्रकार व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्ष सुचिता मोरे, बृहन्मुंबई दक्षिण विभाग कार्यालयाच्या शिक्षण निरीक्षक डॉ. वैशाली वीर, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याध्यक्ष शीतल करदेकर, उमा नाबर यांच्यासह साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

वाचन ही केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नसून ती मनाला समृद्ध करणारी आणि विचारांना नवी दिशा देणारे एक ऊर्जा स्त्रोत असल्याने लहानपणापासूनच विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी, असे सांगत लेखक प्रकाश बाळ जोशी म्हणाले, ग्रंथालयाने वाचनाचा वारसा जतन केला आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होईल. सकाळी ग्रंथदिंडीमध्ये असलेला मुलांचा सहभाग, त्यांचा उत्साह मनाला भारावून टाकणारा होता, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर म्हणाले, राज्यात ११ हजारावर शासन मान्यताप्राप्त सार्वजनिक  ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचन संस्कृती अधिक वृद्धींगत होत आहे. राज्य शासनामार्फत दरवर्षी जिल्हास्तरावर ग्रंथोत्सव आयोजित करून वाचन संस्कृतीला अधिक बळ दिले जात आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर येथे आयोजित ग्रंथोत्सवातील ग्रंथदालनांचा लाभ नागरिक व वाचकांनी घ्यावा.

विद्यार्थ्यांनी स्क्रीन टाइमिंगपासून थोडे बाजूला होऊन पुस्तकांना मित्र बनवावे असे शिक्षण निरीक्षक डॉ. वैशाली वीर यांनी यावेळी म्हणाल्या.  तर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी राज्य शासनाने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयास पुस्तकांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी पाच कोटीचा निधी मंजूर केला असल्याचे सांगितले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड यांनी ग्रंथोत्सवातील दोन दिवसात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती प्रास्तविकात  दिली. ग्रंथोत्सव  हा वाचन संस्कृतीचा उत्सव असून दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सव व पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन एक तरी पुस्तक खरेदी करून वाचक, साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी ग्रंथोत्सवाचा मनमुराद आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले

तत्पूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीमध्ये ज्ञानेश्वर विद्यालय, दिगंबर पाटकर विद्यालय, राजा शिवाजी विद्यालय, सोशल सर्विस लीग विद्यालय, आर. एम. भट हायस्कूल, शिशुविहार माध्यमिक विद्यालय, गुरु नानक विद्यालय, बंगाली एज्युकेशन स्कूल, बालमोहन विद्यामंदिर आणि कीर्ती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ग्रंथदिंडीत सहभागी झालेल्या शाळांचा मान्यवरांच्या हस्ते पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

००००

 

एकनाथ पोवार/स.सं.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp