
नाशिक, दि. 28 मार्च (जिमाका वृत्तसेवा) : 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी बजावत पाचवा क्रमांक पटकावल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कार्यालयाची अधिकृत वेबसाइट, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेनचा शासकीय कामकाजात वापर तसेच भौगोलिक माहिती प्रणालीचा (GIS) प्रभावी वापर अशा सात महत्त्वाच्या घटकांचा समावेश होता. या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक जिल्हा परिषदेने एकूण 165.75 गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला होता.
ई–गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम हा केवळ स्पर्धा नसून प्रशासन अधिक पारदर्शक, जलद आणि लोकाभिमुख करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. नाशिक जिल्हा परिषदेमधील सर्व विभागप्रमुख, गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांचा हा गौरव आहे. भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
–ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
नाशिक जिल्हा परिषदेकडून राबविण्यात आलेल्या विविध डिजिटल उपक्रमांमुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढली असून कामकाज अधिक वेगवान व सुलभ झाले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना अधिक जलद, सुलभ व परिणामकारक सेवा देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
