
मुंबई, दि. 16 मार्च : 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
17 मार्च रोजी वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता राज्यातील दक्षिण भागांमध्ये राहील. यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांचा समावेश असून प्रामुख्याने तेलंगणा आणि कर्नाटक सीमेजवळील भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे. 18 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते. 21 मार्चपासून राज्यातील हवामान स्थिर होण्याचे संकेत आहेत.
रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. तसेच बाजार समित्यांमध्ये आणलेले धान्य व इतर कृषीमाल पावसापासून सुरक्षित राहील यासाठी त्यावर ताडपत्री किंवा अन्य संरक्षणात्मक आच्छादन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची व पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
000
