Pune | Sun, 15 February 2026

Ad

आदिशक्ती अभियानाचा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा

Sunil Goyal | 6 views
आदिशक्ती अभियानाचा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. ११ : आदिशक्ती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व राज्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी आदिशक्ती अभियानाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आयुक्त नयना गुंडे, एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे कैलास पगारे, राज्य महिला आयोगाचे सचिव नंदिनी आवडे, विभागाचे सहसचिव विलास ठाकूर व उपसचिव आनंद भोंडवे उपस्थित होते. उपायुक्त जामसिंग गिरासे यांनी सादरीकरण केले. या बैठकीमध्ये राज्यातील सर्व जिल्हा कार्यक्रमाधिकारी व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

मंत्री तटकरे यांनी यावेळी महिला सशक्तीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रभावी व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी करण्यावर भर दिला. आदिशक्ती अभियानाचा मुख्य उद्देश महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे, त्यांची सुरक्षितता, स्वावलंबन व आत्मविश्वास वाढविणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविणे असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभियानामुळे महिलांचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील सहभाग अधिक बळकट होणार असून त्यासाठी ग्राम पातळीपासून राज्यस्तरापर्यंत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभियानाची अंमलबजावणी गांभीर्याने करावी तसेच ठरविण्यात आलेल्या उद्दिष्टांची वेळेत पूर्तता करावी, असे सांगितले. अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी, प्रलंबित बाबी तसेच आवश्यक सुधारणा उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिशक्ती अभियान अधिक प्रभावी ठरावे यासाठी प्रशासनाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत व व्यापक जनजागृती करावी, असे निर्देशही मंत्री तटकरे यांनी दिले.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp