Pune | Sun, 15 February 2026

Ad

आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी; शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे  आवाहन

Sunil Goyal | 1 views
आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी; शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे  आवाहन

मुंबई, दि. ११ : राज्यातील अनुसूचित जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध असून आदिवासी विकास विभागामार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत ४० पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे.

इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी तत्काळ ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे : – उमेदवार व उमेदवाराचे आई, वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अद्यायावत (२०२६ मधील) क्यूएस वर्ल्ड रँकिंग २०० च्या आत असणे बंधनकारक आहे. विहीत निकषानुसार पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास क्यूएस वर्ल्ड रँकिंग २०० पासून पुढे चढत्या क्रमाने ३०० पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. उमेदवाराच्या पालकांचे, कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील (२०२५-२६ मधील) एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. विहीत निकषानुसार पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास कुटुंबाची उत्पन्न मर्यादा १० लाखांपर्यंत शिथील केली जाईल. या योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुज्ञेय लाभ, निवड कार्यपद्धती, इत्यादी माहितीसाठी आदिवासी विभागाच्या https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा व मुळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करावीत. ऑनलाइन अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. शिष्यवृत्ती अर्जाबाबत अर्जदारांना सर्व माहिती, सूचना ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या ईमेलद्वारे देण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp