Pune | Sun, 05 April 2026

Ad

आकाशात झगमगला महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती

Sunil Goyal | 10 views
आकाशात झगमगला महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती

मुंबई, दि. २७  : सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्रीराम नवमी तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आझाद मैदान येथे भव्य ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले.

रात्रीच्या गडद आकाशात झेपावलेल्या ड्रोननी प्रभू श्रीरामांची धनुर्धारी प्रतिमा साकारत कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ भव्य प्रतिमेने आकाश उजळून निघताच उपस्थितांकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जल्लोष झाला. पुढे छत्रपती संभाजी महाराज, महाराष्ट्रातील गड-किल्ले, गणराय तसेच संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमा आकाशावर साकारत महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा अभिमानास्पद प्रवास सादर करण्यात आला.

या सोहळ्यात मुंबई शहराची ओळखही प्रभावीपणे उभी करण्यात आली. गेटवे ऑफ इंडिया, वांद्रे-वरळी सी-लिंक, ताज महल पॅलेस हॉटेल यांसारख्या स्थळांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. याशिवाय ‘वंदे भारत’ रेल्वे धावत असल्याचा भास निर्माण करणारे दृश्य प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरले. सुमारे १० ते १५ मिनिटे चाललेल्या या शोदरम्यान आझाद मैदानावर उपस्थित आबालवृद्धांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत क्षणोक्षणी टाळ्यांचा कडकडाट केला.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री मा. अॅड. आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्राभिमान जगासमोर प्रभावीपणे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेऊन सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम सातत्याने सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याची संस्कृती ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाची संकल्पना प्रख्यात संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या कल्पनेतून साकारली असल्याचेही सांगितले गेले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंती वर्षानिमित्त विशेष दृश्यरचना सादर करण्यात आली.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सांगितले की, रामनवमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या परंपरेचे वैभव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा आधुनिक माध्यमातून सादर करण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे.

आकाशाच्या विशाल पटावर शिवचरित्र उलगडण्याचा हा उपक्रम प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरला. एकूणच, ड्रोन शोच्या माध्यमातून परंपरा आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवत मराठी अस्मितेची गाथा आकाशावर रेखाटणारा हा सोहळा मुंबईकरांसाठी अविस्मरणीय ठरला.

0000

संजय ओरके/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp