Pune | Thu, 16 April 2026

Ad

आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

Sunil Goyal | 3 views
आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १५ – परस्पर आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले. स्वीडनचे महावाणिज्यदूत स्वेन ओस्टबर्ग यांची ‘कौन्सिल ऑफ कॉर्प्स असोसिएशन ऑफ मुंबई’चे नवे डीन म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल जागतिक व्यापार केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते त्यांचा आणि नव्या कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जागतिक व्यापार केंद्राचे अध्यक्ष विजय कलंत्री यांच्यासह विविध देशांचे महावाणिज्यदूत यावेळी उपस्थित होते.

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले, मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात कार्यरत वाणिज्यदूतांच्या माध्यमातून व्यापार वृद्धी, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि लोकांमधील संबंध अधिक दृढ होण्यास मोठी मदत होत आहे. ‘कौन्सिल ऑफ कॉर्प्स’ ही संस्था या सर्व प्रयत्नांना दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महाराष्ट्र शासन राजनैतिक समुदायाशी अधिक दृढ संवाद आणि सहकार्य वाढविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगताना, विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक पातळीवर शांतता, प्रगती आणि सहकार्य यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून ‘कौन्सिल ऑफ कॉर्प्स’सारख्या संस्थांमुळे हा उद्देश साध्य होऊ शकतो, असे मत व्यक्त करत मंत्री रावल यांनी सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी डीन म्हणून स्वित्झर्लंडचे महावाणिज्य दूत मार्टिन मेयर आणि त्यांच्या टीमने केलेल्या उल्लेखनीय कार्याचेही मंत्री रावल यांनी कौतुक केले. त्यांच्या योगदानामुळे मुंबईतील राजनैतिक समुदाय अधिक सक्षम आणि सक्रिय झाला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

‘कौन्सिल ऑफ कॉर्प्स’चे नवनियुक्त डीन आणि स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ऑस्टबर्ग यांनी भावना व्यक्त करताना जागतिक स्तरावरील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर संवाद, सहकार्य आणि परस्पर समजस्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. मुंबईतील राजनैतिक समुदाय अधिक एकसंध आणि प्रभावी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून विविध देशांच्या महावाणिज्यदूतांचा समावेश असलेल्या या समुदायाच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र शासन आणि ‘कौन्सिल ऑफ कॉर्प्स’ यांच्यातील सहकार्य अत्यंत सकारात्मक, पारदर्शक आणि प्रतिसादक्षम असल्याचे ऑस्टबर्ग यांनी सांगितले. या सहकार्यामुळे राजनैतिक जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडता येत असल्याचे ते म्हणाले. डीन म्हणून आपली भूमिका ‘समन्वयक आणि सेतू’ अशी असेल, असे सांगत त्यांनी ‘कौन्सिल ऑफ कॉर्प्स’मधील एकता बळकट करणे, परस्पर सहकार्य वाढविणे आणि भारतीय प्रशासनाशी सकारात्मक संवाद कायम ठेवणे यावर भर देणार असल्याचे सांगितले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय मूल्यांनी प्रेरित होऊन सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सर्वांच्या सहकार्याने मुंबईतील ‘कौन्सिल ऑफ कॉर्प्स’ अधिक प्रभावी, समावेशक आणि भविष्याभिमुख कार्य करीत राहील, असा विश्वास व्यक्त करत ऑस्टबर्ग यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

विजय कलंत्री यांनी प्रास्ताविनात जागतिक व्यापार केंद्राच्या कार्याची माहिती दिली.

0000

बी.सी.झंवर/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp