Pune | Sun, 05 April 2026

Ad

आरोग्य क्षेत्रात एआय व स्टार्टअप्समुळे नवे परिवर्तन

Sunil Goyal | 10 views
आरोग्य क्षेत्रात एआय व स्टार्टअप्समुळे नवे परिवर्तन

मुंबई, दि. २९ : वैद्यकीय प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी स्टार्टअप्स, सरकार आणि वैद्यकीय संस्थांमध्ये समन्वय वाढवणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय प्रणाली व संशोधन अधिक बळकट करण्यासाठी स्टार्टअप्सची भूमिका या विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा-आधारित नवकल्पनांमुळे आरोग्य सेवा अधिक प्रभावी, सुलभ आणि परिणामकारक होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करताना प्रत्यक्ष अंमलबजावणी, कौशल्याधारित शिक्षण आणि मजबूत पायाभूत व्यवस्था यावर या चर्चासत्रात विशेष भर देण्यात आला.

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथील ‘पल्स वैद्यकीय परिषद 2026 परिषदेत आयोजित केलेल्या या चर्चासत्रात वर्ल्ड बँकेचे टास्क टीम लीडर अमिथ नागराज बाथुला, निरामय एआयच्या संस्थापक डॉ. गीता मंजुनाथ, क्युअर एआयचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ .शिबू विजयन, मेडअर्थ कॅपिटलचे मॅनेजिंग पार्टनर गणेश सबत, पार्लमेंट हेल्थचे संस्थापक डॉ. राजेंद्र प्रताप गुप्ता यांनी सहभाग घेतला.

एआय आणि डेटा-आधारित नवकल्पनांमुळे आरोग्य क्षेत्रात होत असलेल्या बदलांवर या चर्चासत्रात सखोल चर्चा करण्यात आली. जीटी भारतचे भागीदार निलेश माहेश्वरी यांनी या चर्चेचे उत्कृष्ट समन्वयन केले.

आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सना तातडीने अनुकूल वातावरण देण्याची गरज वर्ल्ड बँकेचे टास्क टीम लीडर अमिथ नागराज बाथुला यांनी व्यक्त केली. सध्याच्या व्यवस्थात्मक त्रुटींमुळे नवीन उपक्रम ‘पायलट ट्रॅप’मध्ये अडकत असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बाथुला यांनी स्टार्टअप्सच्या प्रगतीसाठी आरोग्य व्यवस्था आणि स्टार्टअप तंत्रज्ञानात समन्वय वाढवणे, खरेदी प्रक्रिया केवळ वस्तूऐवजी ‘परिणामावर आधारित’ करणे आणि स्टार्टअप्ससाठी स्पष्ट ‘अकाउंटबिलिटी मॅट्रिक्स’ तयार करणे हे तीन मुख्य उपाय सुचवले.

वैद्यकीय शिक्षणातील त्रुटी दूर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर फायदेशीर ठरत आहे. आंध्र प्रदेशातील एका सिम्युलेशन लॅबचे उदाहरण देताना ते म्हणाले की, एआयमुळे शल्यविशारदांच्या चुकांचे अचूक विश्लेषण होऊन प्रशिक्षणाचा दर्जा सुधारतो. नर्सिंग आणि पॅरामेडिकल क्षेत्रात अशा उपक्रमांची मोठी व्याप्ती आहे.

आंध्र प्रदेश सरकारने आरोग्य विभागाचा डेटा आणि सुविधा स्टार्टअप्ससाठी खुल्या केल्याने तेथे सध्या 20 स्टार्टअप्स यशस्वीपणे काम करत आहेत. शासनाचा खुलेपणा, योग्य नियामक चौकट आणि नाविन्यपूर्ण खरेदी व्यवस्था या तीन घटकांचा संगम आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

निरामय एआयच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गीता मंजुनाथ यांनी वैद्यकीय संशोधन अधिक प्रभावी करण्यासाठी स्टार्टअप्स, वैद्यकीय महाविद्यालये आणि सरकार यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, प्रयोगशाळेत सहज उपलब्ध डेटावर तयार केलेली एआय मॉडेल्स सुमारे 95 टक्के अचूकता दाखवतात, पण ती थेट सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत वापरण्यास तयार नसतात. कारण प्रत्यक्ष आयुष्यातील डेटामध्ये गोंधळ (नॉईज) आणि पूर्वग्रह (बायस) असतात, त्यामुळे अशा मॉडेलवर आंधळा विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. यासाठी केवळ प्रयोगशाळेतील चाचण्या पुरेशा नसून रुग्णालयातील नोंदींवर सखोल अभ्यास, अंध पद्धतीने होणाऱ्या क्लिनिकल चाचण्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्यक्ष चाचणी अशी टप्प्याटप्प्याने प्रक्रिया गरजेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निरामयच्या स्तन कर्करोग तपासणी तंत्रज्ञानाचा ग्रामीण भागात आशा कार्यकर्त्यांकडून वापर करताना काही अडचणी आल्या. या अनुभवातून कमी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना समजेल असे तंत्रज्ञान विकसित करणे किती महत्त्वाचे आहे, हे डॉ. गीता यांनी अधोरेखित केले. त्या पुढे म्हणाल्या की, केवळ तांत्रिक अचूकता पुरेशी नाही. त्यासोबत खर्च आणि फायदा, आरोग्य व्यवस्थेत समावेश आणि मोठ्या प्रमाणावर वापराची शक्यता यांचाही विचार करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींची खात्री झाल्यावरच एआय मॉडेलचा वापर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात करावा.

महाराष्ट्र शासनाच्या ‘स्माईल’ कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष क्षेत्रात अभ्यास करणे शक्य झाले असून, अशा सरकारी आणि स्टार्टअप भागीदारीमुळे दर्जेदार संशोधनाला चालना मिळते, असे डॉ. गीता यांनी नमूद केले. तसेच, भविष्यात एआयचा वापर करणारे डॉक्टर इतरांपेक्षा पुढे राहतील, त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांनी एआय साधनांचा वापर आणि त्यांचे परीक्षण शिकून तयार राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

क्युअर एआयचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शिबू विजयन यावेळी म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही डॉक्टरांची जागा घेण्यासाठी नाही, तर त्यांना मदत करणारे साधन म्हणून वापरली पाहिजे. ते म्हणाले की, सध्या वैद्यकीय शिक्षण आणि परीक्षा पद्धती जास्त करून पुस्तकातील ज्ञानावर आधारित आहेत. मात्र त्या प्रत्यक्ष कौशल्यांवर आधारित असणे गरजेचे आहे. तसेच रुग्णाची परिस्थिती समजून घेणे, त्याच्याशी सहानुभूती ठेवणे आणि उपचाराबाबत अंतिम निर्णय घेणे ही जबाबदारी डॉक्टरांचीच राहिली पाहिजे. स्टार्टअप्सनी प्राथमिक आरोग्य सेवांवर लक्ष दिले नाही, तर मोठ्या रुग्णालयांवर (तृतीयस्तरीय) अनावश्यक ताण वाढेल आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्था बिघडू शकते, असा इशारा त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, आयुष्मान भारत आरोग्य वेलनेस केंद्रे, ई-संजीवनीसारखे टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म आणि इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्स या सर्वांना एआयशी जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा भरायचा ताण कमी होईल, काम अधिक नियोजनबद्ध होईल आणि नवीन तंत्रज्ञानाचा खरा फायदा मिळेल. स्टार्टअप्ससाठी यशाचे मोजमाप (केपीआय) म्हणजे केवळ तंत्रज्ञान तयार करणे नाही, तर ते प्रत्यक्षात प्रभावीपणे वापरले जाते का आणि त्याचा परिणाम काय होतो, हे महत्त्वाचे आहे, असेही   डॉ. शिबू विजयन यांनी सांगितले.

मेडअर्थ कॅपिटलचे व्यवस्थापकीय भागीदार गणेश सबत यांनी आरोग्य क्षेत्रातील क्षमता, प्रणाली आणि अंमलबजावणीतील उणिवांकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, तांत्रिक उपाय उपलब्ध असले तरी आरोग्य व्यवस्थेतील डेटा आणि सेवा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या असल्याने मोठे आव्हान निर्माण होते. नागपूरमध्ये टाटा मेमोरियल रुग्णालयाने प्राथमिक आरोग्य केंद्रांसोबत केलेल्या कामामुळे कर्करोग रुग्णांची सेवा सुधारल्याचे त्यांनी उदाहरण दिले.

तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी एआयचा उपयोग होऊ शकतो, पण त्यासाठी प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय स्तरावरील आरोग्य संस्थांमधील डेटा एकत्र जोडणे आणि योग्य अंमलबजावणी व्यवस्था उभारणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गुंतवणूकदार म्हणून बोलताना त्यांनी सांगितले की, भारताची लोकसंख्या मोठी असली तरी प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. अनेक कुटुंबे गंभीर आजारांसाठी मोठा खर्च करतात, पण दीर्घकालीन आजारांकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी आरोग्यावर सरकारी खर्च वाढवणे गरजेचे आहे. सध्या योजना आणि परतफेड मर्यादित असल्याने अनेक मोठी रुग्णालये सहभागी होत नाहीत. एआय आणि स्टार्टअप्सना प्रशिक्षण, परिणामाधारित परतफेड आणि प्रोत्साहन दिल्यास रुग्णांच्या आरोग्यात खरा बदल दिसू शकतो, असे मत त्यांनी मांडले.

पार्लमेंट हेल्थचे संस्थापक डॉ. राजेंद्र प्रताप गुप्ता यावेळी म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्स खूप गरजेचे आहेत. आरोग्य सेवेमध्ये प्राथमिक ते उच्चस्तरापर्यंत मोठ्या बदलांची गरज आहे. वैद्यकीय शिक्षणातही पारंपरिक पद्धतीऐवजी डिजिटल आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर द्यावा लागेल. भविष्यात नोकऱ्यांपेक्षा कौशल्यांना अधिक महत्त्व असेल, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. गुप्ता म्हणाले की, आरोग्य क्षेत्र संवेदनशील असल्याने प्रत्येक स्टार्टअपने आपले तंत्रज्ञान योग्यरीत्या तपासलेले (क्लिनिकल चाचणी केलेले) असावे, आणि यासाठी सरकारने मदत करावी. तसेच, स्टार्टअप्सना फक्त कमी अनुदान देऊन उपयोग नाही. मोठा निधी, एकाच ठिकाणी मार्गदर्शन आणि सरकारी संस्थांकडून डेटा व सुविधा मिळाल्यास महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात मोठे नाव कमावू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0000

दत्तात्रेय कोकरे/वि.स.अ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp