
मुंबई, दि. १ : राज्यात अन्न व औषध प्रशासनाची प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याविरुद्ध मोहीम सुरू असून ३० व ३१ मे २०२६ या दोन दिवसात तब्बल ३२ आरोपींना अटक करण्यात आली असून, २६ आस्थापना सील व १२ लाख १६ हजार ९६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई, कोंकण, पुणे, नाशिक व छत्रपती संभाजीनगर, अमरावती या विभागात कारवाई करण्यात आली. त्यात कोकण विभागात तब्बल १६ आस्थापनाविरुद्ध कारवाई करून १६ लोकांना अटक करण्यात आली. बृहन्मुंबईत एका ठिकाणी कारवाई करण्यात आली व दोन जणांना अटक करण्यात आली. पुण्यात तीन ठिकाणी कारवाई करून दोन जणांना अटक, नाशिकमध्ये दोन कारवाई, दोन जणांना अटक छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ कारवाई व सात जणांना अटक करण्यात आली. तसेच अमरावतीमध्ये तीन कारवाई व तीन जणांना अटक करण्यात आली.
प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध भारतीय न्याय संहिता चे कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याचे कलम २६, २७, ३०(२) (a) आणि कलम ५९ अंतर्गत एफआयआर दाखल करून अटक करण्यात आली.
अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका येताच नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. तक्रार करतेवेळी स्वतःचे नाव व पत्ता/संपर्क क्रमांक, भेसळ केल्या जाणाऱ्या ठिकाणाचा या आस्थापनेचा अचूक पत्ता व कोणत्या अन्नपदार्थात भेसळ केली जाते याची माहिती तक्रारीत नमूद करावी, असे आवाहन आयुक्त मुंढे यांनी केले आहे.
0000
किरण वाघ/विसंअ
