
अमरावती, दि. 10 (जिमाका) : अमरावतीला गझलेचा समृद्ध वारसा आहे. कविवर्य सुरेश भट यांनी सुरू केलेला प्रवास हा आता भिमराव पांचाळे यांनी जपला आहे. या महान व्यक्तींच्या कार्याचा वारसा पुढे चालावा यासाइी सुरेश भट यांचे स्मारक आणि गझलेसाठी गुरूकुल उभारण्याची महत्वपूर्ण घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
गझलनवाज भिमराव पांचाळे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ईलेक्ट्रॉनिक मिडीया असोशिएशनच्या वतीने सांस्कृतिक भवनात नागरी सत्कार पार पडला. यावेळी खासदार बळवंत वानखेडे, आमदार संजय खोडके, केवलराम काळे, सुलभा खोडके, राजेश वानखडे, प्रविण तायडे, महापौर श्रीचंद तेजवाणी, प्रविण पोटे, हेमंत काळमेघ, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, ईलेक्ट्रॉनिक मिडीया असोशिएशनचे अध्यक्ष नितेश राऊत, गिता पांचाळे, भाग्यश्री पांचाळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी स्मारक आणि गुरूकुलासाठी जागा आणि निधीची तरतूद शासन करणार आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, तसेच गझलेसाठी जीवन समर्पित करणारे श्री. पांचाळे यांनी गुरूकुलाची जबाबदारी स्विकारण्याचे आवाहन केले. यातून गझलेचे जतन आणि संवर्धन होण्यास मदत हाईल. लवकरच या दोन्हीचे भूमिपूजन करण्याचा मानस असून यावेळीही श्री. पांचाळे यांचा नागरी सत्कार करण्यात येईल.
गझलेमध्ये जीवन समृद्ध करण्याची क्षमता आहे. गझलेचे शब्द आणि सूर जीवन समृद्ध करतात. श्री. पांचाळे यांच्यामुळे मराठी गझलेला सांस्कृतिक परंपरेत स्थान मिळाले. गझल जगायला लावत असल्याने आज तरूण पिढी गझलेकडे आकर्षित होत आहे. मराठी गझलेमुळे प्रदेशाची ओळख इतर देशांमध्ये होण्यास मदत मिळाली आहे. गझलेतून संपूर्ण विश्व उभे राहत असल्यामुळे गझलेच्या संवर्धनासाठी राज्य शासन नेहमीच पुढाकार घेईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
श्री. पांचाळे यांनी अमरावतीमुळे जीवन सुकर झाले. नागरिकांचे प्रेम आणि गझलेने मोठे केले आहे. सुरेश भटांना आदर्श मानून सुरू केलेल्या प्रवासाला पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. कष्ट हे सर्वांना असून त्याचे उदात्तीकरण न करता ध्येय ठेऊन वाटचाल केल्याने या टप्प्यापर्यंत आल्याचे सांगितले.
सुरवातीला श्री. पांचाळे यांची पुस्तकतुला करून पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संजय शेंडे यांनी प्रास्ताविक केले. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.
000
