Pune | Fri, 17 July 2026

Ad

भारतीय स्थापत्यकलेचा सुंदर नमुना असलेली म्युरल्स नदीघाट परिसरात उभारावी – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

Sunil Goyal | 3 views
भारतीय स्थापत्यकलेचा सुंदर नमुना असलेली म्युरल्स नदीघाट परिसरात उभारावी – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक, दि. १७: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या नाशिक शहर आणि परिसरातील विविध नदीघाटांची आज विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पाहणी केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्त लाखो भाविक नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणार असल्याने घाटांच्या ठिकाणी भारतीय स्थापत्यकलेचा नमुना असलेली सुंदर म्युरल्स उभारावीत आणि परिसरात वृक्षारोपणाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक काम हे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होईल, याकडे लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी आज नाशिक शहर आणि परिसरातील जलसंपदा विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध नदी घाटांच्या कामांची पाहणी केली. नदीघाट परिसर विकास आणि आवश्यक सोईसुविधा निर्मितीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कामाचा वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करताना कामाच्या दर्जाबाबत दक्षता बाळगण्याच्या सूचनादेखील संबंधित विभागांचे अधिकारी, काम करण्याऱ्या कंपन्यांचे अभियंते यांना केल्या.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी स्वामी नारायण पूल येथील कपिला घाट, रामदास स्वामी मार्ग टाकळी रोड येथील नंदिनी घाट, दसक घाट आणि ओढा घाटाची पाहणी केली. त्यांनी तपोवनपर्यंत संपूर्ण घाटकामांची पाहणी करून अभियंत्यांना विविध सूचना केल्या. भाविकांची होणारी गर्दी, त्यांना घाटावर येण्यासाठीचे आणि बाहेर जाण्यासाठीचे मार्ग, गर्दी नियंत्रणासाठी निर्गमन ठिकाण पुरेसे रुंद ठेवणे आणि गुणवत्तापूर्ण कामांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

नाशिक येथे येणाऱ्या भाविकांना घाट परिसर अतिशय सुंदर वाटला पाहिजे, त्यासाठी घाटाच्या दोन्ही बाजूंना भारतीय स्थापत्यकलेचा सुंदर नमुना असलेले म्युरल्स बनविण्यात यावेत. भाविकांना नाशिक येथे आल्यावर प्रसन्नतेची अनुभूती यायला हवी, त्यादृष्टीने काम अपेक्षित असल्याचे डॉ. गेडाम यांनी नमूद केले.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येथे येणाऱ्या भाविकांना घाट परिसरात विविध सुविधा असण्याबरोबरच ज्याप्रमाणे नांदुर–दसक येथे घाटाच्या दोन्ही बाजूला वृक्ष आहेत, त्याचप्रमाणे इतर घाटांवर वृक्षारोपण करण्याचे नियोजन करावे, चालताना भाविकांना त्रास होणार नाही, याचपद्धतीने फरशी व इतर साहित्य वापरावे. घाट तयार करतांना वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

प्रत्येक घाटावर जाऊन विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी कामांच्या अनुषंगाने यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन केले गेले आहे किंवा नाही, याचीही पाहणी केली. घाट कामांच्या ठिकाणी सूचविण्यात आलेले बदल आणि भाविकांच्या सोईसाठी आवश्यक सुविधांची पूर्तता होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धन, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आणि पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, यांनी सध्या सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे गुणनियंत्रण सल्लागार तथा सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता किशोर पाटील, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे सहायक संशोधन अधिकारी योगेश सोमवंशी, सल्लागार अजिंक्य इनामदार, टीयुव्ही सूद साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेडचे सुरेंद्र प्रताप कट्टा, राहुल पोरे, जलसंपदा विभागाचे उपअभियंता प्रवीण पवार, समीर साळवे, योगेश्वर विंचू, तुषार खैरनार, नारायण डावरे आदी उपस्थित होते.

००००

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp