मुंबई, दि ०१ : खरवंडी येथील श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या विकासासाठी वनविभागाची 4 हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असून यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. खरवंडी येथील ही 4 हेक्टर जागा भक्तगणांच्या सेवासुविधांसाठी, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती.
“केंद्र सरकारकडे या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात आला होता त्याला यश आले आहे. श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत आणि विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती भाविकांना देताना अतिशय आनंद होतो आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार व्यक्त करताना म्हटले आहे.
०००