Pune | Mon, 20 July 2026

Ad

बुराई नदीकाठच्या पूरग्रस्त वस्त्यांना दिलासा ; अडीच कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Sunil Goyal | 9 views
बुराई नदीकाठच्या पूरग्रस्त वस्त्यांना दिलासा ; अडीच कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

धुळे, दि. १९ जुलै 2026 (जिमाका वृत्तसेवा): शिंदखेडा शहरातील बुराई नदीलगतच्या नवापुल ते विहीर (रज्जाक नगर) परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या १.५० कोटी रुपयांच्या संरक्षण भिंतीचे तसेच शहरातील सुमारे १ कोटी रुपयांच्या सोलर स्ट्रीट लाईटचे भूमिपूजन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला शिंदखेडा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष उदय देसले, सार्वजनिक बांधकाम सभापती मनोहर पाटील, स्वच्छता व आरोग्य सभापती श्रीमती संगीता भिल, पाणीपुरवठा सभापती श्रीमती पुनम मराठे, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती आरेफाबी अबुतालीब कुरेशी, गटनेते अनिल वानखेडे, नगरसेवक यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, बुराई नदी ही शहराची नैसर्गिक संपत्ती असून तिचे संरक्षण करतानाच नदीचे मूळ स्वरूप जपणे आवश्यक. आहे.  संरक्षण भिंत परिसरात आणि नदीपात्रात अतिक्रमण करू नये. अन्यथा भविष्यात महापुरात भिंतीलाही धोका निर्माण होऊ शकतो. बुराई नदी बारमाही प्रवाही करण्यासाठीही विविध उपाययोजनांवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात पुराचे पाणी घरांमध्ये शिरत असल्याने संरक्षण भिंत या भागासाठी दिलासादायक ठरणार आहे. नदीकाठाचा परिसर विकसित झाल्यास तो पर्यटन आणि नागरिकांच्या फिरण्यासाठी आकर्षणाचे केंद्र बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी परिसरात बसविण्यात येणाऱ्या सोलर स्ट्रीट लाईटची काळजी घेण्याचे आवाहन करताना सार्वजनिक मालमत्तेची चोरी किंवा नुकसान होणार नाही, यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, डीपीडीसी निधीतून यापूर्वी सोलर लाईट, सार्वजनिक शौचालये, ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सभागृह, पेव्हर ब्लॉक आदी विविध विकासकामे करण्यात आली असून आगामी काळातही विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण माळी यांनी केले.

००००

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp