
मुंबई, दि. ८ : धारावी पुनर्वसन प्रकल्पामधून धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनास मंजुरी देण्याच्या मागणीबाबत कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ही समिती तीन महिन्यात सर्व बाजू विचारात घेऊन शासनास अहवाल सादर करेल.
धारावी पुनर्वसन प्रकल्पामधून धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनास मंजुरी देऊन विस्तारित जमीन हक्क मिळण्याबाबतच्या मागणीसंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. स्थानिक आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांच्यासह कोळीवाड्यातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जमाबंदी आयुक्त अथवा मुंबई विभागीय उपसंचालक, धारावी संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी अधिकारी यांचा समावेश असेल. ही समिती कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनाच्या मंजुरीबाबतच्या मागणीचा सर्वंकष विचार करून तसेच धारावी कोळीवाड्यातील प्रतिनिधींशी चर्चा करून येत्या तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करेल. त्यानंतर शासन पुढील निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
०००
बी.सी.झंवर.विसंअ
