Pune | Wed, 08 April 2026

Ad

दिव्यांग कलाकारांना अभिव्यक्तीसाठी अधिक संधी उपलब्ध करुन द्यावी – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

Sunil Goyal | 3 views
दिव्यांग कलाकारांना अभिव्यक्तीसाठी अधिक संधी उपलब्ध करुन द्यावी – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

मुंबई, दि. ८ : दिव्यांग कलाकारांमध्ये असलेली सर्जनशीलता, जिद्द आणि कौशल्य ओळखून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास ते समाजाच्या मुख्य प्रवाहात अधिक प्रभावीपणे सहभागी होऊ शकतात. यासाठी दिव्यांग कलाकारांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.

मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित दिव्यांग कलाकारांसाठीच्या विशेष कला कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

 

या कार्यशाळेस दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव माणिक गुरसळ, ‘आयसोवा’च्या अध्यक्ष मीनाक्षी अग्रवाल, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट चे कुलगुरू प्रा. हिम कुमार चॅटर्जी, निपीडचे संचालक डॉ. बी. व्ही. रामकुमार, ‘आयसोवा’च्या सदस्य डॉ. लीना गुप्ता, अर्चना श्रीवास्तव, झेबा नाईक तसेच दिव्यांग कलाकार व पालक उपस्थित होते.

मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले, अनेक दिव्यांग कलाकार विविध माध्यमांतून, विशेषतः डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून स्वतःहून कौशल्य आत्मसात करत आहेत. योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि संधी मिळाल्यास हे कलाकार अधिक सक्षमपणे पुढे येऊ शकतात. संबंधित संस्थांनी अशा कलाकारांसाठी विशेष उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच प्रदर्शनाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देणे गरजेचे आहे. दिव्यांग कलाकारांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी स्वतंत्र गॅलरी, प्रदर्शनाचे व्यासपीठ तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर द्यावा. यामुळे त्यांच्या कलाकृतींना व्यापक ओळख मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

प्रा. हिम कुमार चॅटर्जी म्हणाले, कला ही औपचारिक चौकटीत न बसता मनातून उमलणारी आणि मुक्त अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये दिसून आलेली ऊर्जा, उत्साह प्रेरणादायी आहे. या कार्यशाळेत शिक्षक आणि समन्वयकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतांचा अभ्यास करून त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला. अशा उपक्रमांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळते असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी दिव्यांग कलाकारांशी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी संवाद साधत त्यांनी तयार केलेल्या चित्र प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच दिव्यांग कलाकारांना प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन यांच्या सहकार्याने तसेच आयसोवा आणि निपिड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत मुंबई व परिसरातील १८ पेक्षा अधिक संस्थांतील ४२ दिव्यांग कलाकार सहभागी झाले होते. कार्यशाळेत रेखाटलेल्या कलाकृतींचे चित्र प्रदर्शन १० एप्रिल २०२६ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या मुख्य सभागृहात सर्वांसाठी खुले राहणार आहे. ‘आयसोवा’च्या सदस्य डॉ. लीना गुप्ता यांनी यावेळी आभार मानले.

०००

शैलजा पाटील/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp