Pune | Sat, 04 April 2026

Ad

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 1 views
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ०३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा दिली आहे. त्यांचे कार्य आणि योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न शासन करत असून, यावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल. जयंतीचा सोहळा त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल, २०२६ रोजीच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, माजी आमदार प्रकाश गजभिये, मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, भन्ते डॉ. राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी यांच्यासह विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागील उद्देश केवळ औपचारिकता नसून त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे हा आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक असून, त्यातील समावेशकतेच्या तत्त्वामुळे भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क आणि प्रगती यामागे कोणाचे योगदान आहे, हे नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. त्यामुळे जयंती सोहळा हा केवळ उत्सव न राहता विचारांचा प्रसार करणारा पर्व ठरतो.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.१४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायी आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी. उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात यावेत. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध ठेवावी. तसेच, दादर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.

नागरिकांना मार्गदर्शन होण्यासाठी विविध ठिकाणी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी दरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशासह जगभर मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्याचा उल्लेख करत, हा सोहळा अधिक उत्तम पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मंत्री संजय शिरसाट म्हणाले, भारतीय संविधान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम विभागामार्फत हाती घेण्यात आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे. जयंती सोहळ्याच्या निमित्ताने यावर्षी काही विशेष उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ड्रोनच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित भव्य ड्रोन शो चैत्यभूमी परिसरात सादर करण्यात येणार आहे.

या बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, ‘लोकराज्य’ मासिकाचा विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिद्धी याबाबत चर्चा झाली व याबाबत निर्देश देण्यात आले.

बैठकीत मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

0000000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp