Pune | Wed, 22 July 2026

Ad

दरडप्रवण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना उभारण्याच्या कामांना गती द्या – मंत्री आदिती तटकरे

Sunil Goyal | 5 views
दरडप्रवण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना उभारण्याच्या कामांना गती द्या – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. २१ :  नैसर्गिक आपत्तीच्या काळात दरड कोसळण्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण भागांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामांना प्राधान्याने गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालयात श्रीवर्धन, रोहा, तळा, माणगाव आणि भिसीखंड परिसरातील आपत्कालीन व्यवस्थापन कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सत्यनारायण कांबळे, रायगडचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, उपअभियंते तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, पावसाचा जोर वाढल्यानंतर दरड कोसळण्याच्या घटनांची शक्यता वाढते. अशा घटनांमुळे जीवितहानी व वित्तहानी होण्याबरोबरच महामार्ग आणि महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर दरडप्रवण भागांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यावश्यक असून संबंधित कामे युद्धपातळीवर आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीदरम्यान जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीअंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे किती प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत, किती प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत आणि त्यांची सद्यस्थिती काय आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

नागरिकांच्या जीविताचे संरक्षण आणि पावसाळ्यातील आपत्तीजन्य परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करत संरक्षणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp