Pune | Mon, 13 April 2026

Ad

एआयच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा; सध्या प्रयोगशील आणि आधुनिक शेतीची गरज – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Sunil Goyal | 1 views
एआयच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा; सध्या प्रयोगशील आणि आधुनिक शेतीची गरज – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे दि.१३ : कृषी क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ची जोड देऊन उत्पादनवाढ साधता येईल आणि त्या उत्पादनाला सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतीचे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकते, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. यासाठी कृषी विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता, नवतंत्रज्ञानाचा स्वीकार आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यावर भर देत कृषी शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.

पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा ३८ वा वर्धापनदिन कार्यक्रम सोमवार (ता. १३) रोजी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना भरणे यांनी शेतीत तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड, उपाध्यक्ष हनुमंत मोहिते, प्रा. डॉ. जनार्दन कदम, कृषीचे माजी सचिव नानासाहेब पाटील, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. महानंद माने, सचिव अतुल मारणे, अनिल महामुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांना ‘कृषी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच प्रा. डॉ. रामचंद्र साबळे, नांदेड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रमोद देशमुख आणि सचिन भालिंगे यांना ‘कृषी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल असे पुरस्कारांचे स्वरूप होते.

आपल्या भाषणात श्री.भरणे म्हणाले की, ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी यंदाच्या मॉन्सूनबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. शेतकऱ्यांसाठी ही बाब आशादायी ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी चांगल्या पावसावर शेतकऱ्यांची स्वप्ने अवलंबून असल्याचे नमूद केले. योग्य पर्जन्यमान झाल्यास पीक उत्पादन आणि फळबागांची वाढ साध्य होते; मात्र पावसाअभावी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी विभाग आणि शेतकरी यांचे अतूट नाते असल्याचे सांगताना भरणे यांनी कृषी शिक्षणाची भूमिका अधोरेखित केली. “शेतकरी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतात. त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली पाहिजे,” असे ते म्हणाले. स्वतःचा प्रवास सांगताना त्यांनी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते विविध महत्त्वाच्या पदांपर्यंतचा प्रवास हा संधी आणि कर्तृत्वाच्या बळावर घडल्याचे सांगितले.

दिवंगत नेते अजित पवार यांनी व्यक्तीमधील गुण ओळखून संधी दिल्यामुळेच हा प्रवास शक्य झाला, असेही त्यांनी नमूद केले. सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हीच आपली कार्यपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी नवीन वाण आणि तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ५५-५६ वर्षांत विद्यापीठाने ३२० पेक्षा अधिक पिकांचे सुधारित वाण आणि ५५ नवीन कृषी यंत्रे विकसित केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर गायकवाड यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp